कोल्हापूर: सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन अंतर्गत सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे बी.एस.सी.नर्सिंग ६ वी बॅच व जी.एन.एम. नर्सिंग ४ थी बॅच यांचा “लॅम्प लाईटिंग व शपथविधी समारंभ” परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या पावन उपस्थितीत प्रेरणादायी व उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलचे अध्यक्ष डॉ. रामलिंग माळी व कोल्हापूर सर्कलचे आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना रामलिंग माळी बोलत होते. “नर्सिंग या व्यावसायिक कोर्ससाठी काही लोक आवड म्हणून येतात तर काही लोक नाईलाज म्हणून हा व्यवसाय निवडतात. पण नर्सिंग हे एक आदर्श क्षेत्र आहे. या क्षेत्राकडे आवडीने लक्ष देवून काम केल्यास निश्चितच आपण प्रभावी काम करू शकता. महाराष्ट्रातील अनेक शहरात हि सिद्धगिरी महाविद्यालया सारखे आदर्शवत व सुविधांनीयुक्त महाविद्यालय चालवणे अशक्यप्राय आहे. खर तर सिद्धगिरी नर्सिंग महाविद्यालय सर्वांच्यासाठी एक आदर्श महाविद्यालय ठरेल.” असे मत त्यांनी व्यक्त केले.
आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यावेळी म्हणाले, “नर्सिंग कर्मचारी यांची आरोग्य विभागात मागणी मोठी आहे. चांगले परीचारीक्तेचे शिक्षण घेतलेले आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ मिळणे हि दुरापास्त होत चालले आहे. सिद्धगिरी नर्सिंग महाविद्यालय केवळ नर्सिंग स्टाफ तयार करत नाही तर संस्कारांची जोड असणारी, सामाजिक ऋण म्हणून सेवा कार्यास तत्पर असणारी एक पिढी तयार करणारा स्त्रोत आहे.
या कार्यक्रमास परम पूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांची पावन उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वामीजी म्हणाले,“काहीही विचार न करता आणि निरभय भावनेने जी सेवा केली जाते, तीच खरी सेवा असते. ती करण्यासाठी तुम्ही हे क्षेत्र निवडले आहे. हे अत्यंत पवित्र क्षेत्र आहे. यापेक्षा दुसरे पवित्र क्षेत्र असूच शकत नाही. ज्याची सेवा जन्मदात्यांनाही करता येत नाही, त्यांची सेवा करण्याचे सौभाग्य तुम्हाला लाभले आहे.”यावेळी मठाचे ट्रस्टी प्रताप भोसले, सिद्धगिरी नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या प्रा. रेगिना सातवेकर, उपप्राचार्य सुरज चोपडे, सिद्धगिरी संस्थान मठाचे कार्यकारी संचालक यशवर्धन बारामतीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी गुंडोपंत वड, सिद्धगिरी हॉस्पिटलच्या जननी विभागाच्या संचालिका डॉ. वर्षा पाटील, मानव संसाधन विभाग प्रमुख विवेक सिद यांची उपस्थिती होती
