सिध्दगिरी हॉस्पिटलमध्ये जगातील पहिली १७ तासांची अतिदुर्मिळ ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वी; मेंदु तज्ञ डॉ.शिवशंकर मरजक्के

 

कोल्हापूर : सिध्दगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे जगातील पहिली मानली जाणारी १७ तासांची अतिदुर्मिळ ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून जागतिक वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक यशामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील एका धर्मादाय रुग्णालयाने जागतिक वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले आहे. अशी माहिती जागतिक कीर्तीचे मेंदू तज्ञ डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांना महानगरांप्रमाणेच जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, या दूरदृष्टीतून सिध्दगिरी मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रेरणेने सिध्दगिरी हॉस्पिटलची उभारणी झाली. आज त्याच संकल्पनेचे मूर्त स्वरूप म्हणून सिध्दगिरीने आंतरराष्ट्रीय वैद्यकीय क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. रुग्णसेवा, संशोधन आणि अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान यांचा संगम घडवत संस्थेने आरोग्यसेवेचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
केसची गुंतागुंत
सदर रुग्णाला Cavernous Internal Carotid Artery (ICA) Aneurysm हा अत्यंत धोकादायक आणि दुर्मिळ आजार होता. मुख्य आव्हान असे होते की, Persistent Primitive Trigeminal Artery (PPTA) — जी एक भ्रूणावस्थेतील अतिदुर्मिळ रक्तवाहिनी आहे — ती ICA च्या त्याच अ‍ॅन्युरिझम असलेल्या भागातून निघत होती. संपूर्ण पोस्टेरिअर सर्क्युलेशन, ब्रेन स्टेम व लहान मेंदू यांना रक्तपुरवठा करणारी ही PPTA एकमेव रक्तवाहिनी होती. लहान मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या दोन्ही व्हर्टेब्रल आर्टरीज जन्मतःच अस्तित्वात नव्हत्या.
वैद्यकीय साहित्य आणि जागतिक संशोधनामध्ये अशा प्रकारच्या रुग्णाची नोंद यापूर्वी कधीही झालेली नसल्याने ही केस अत्यंत दुर्मिळ आणि अभूतपूर्व मानली जात आहे. या परिस्थितीत शस्त्रक्रियेतील अगदी छोटी चूकसुद्धा रुग्णासाठी जीवघेणी ठरू शकत होती. मेंदूच्या महत्त्वाच्या भागांचा रक्तपुरवठा कायम राखत धोकादायक रक्तवाहिनीचे सुरक्षित व्यवस्थापन करणे हे अत्यंत मोठे आव्हान होते. दोन जून रोजी १७ तास चाललेल्या या हाय-फ्लो बायपास शस्त्रक्रियेत न्यूरोसर्जरी, न्यूरो अॅनेस्थेशिया, न्यूरोफिजिओलॉजी, रेडिओलॉजी आणि नर्सिंग विभागातील तज्ज्ञांनी सलग १७ तास अत्यंत एकाग्रतेने, अचूक नियोजनाने आणि उत्कृष्ट समन्वयाने काम करत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.
यावेळी भूलतज्ज्ञ डॉ.प्रकाश भरमगौडर म्हणाले, जागतिक ख्यातीचे मेंदू शल्यविशारद डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी यापूर्वी १०० हून अधिक ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. या समृध्द अनुभवाच्या बळावरच वैद्यकीय साहित्यात यापूर्वी नोंद नसलेल्या या अतिदुर्मिळ आणि जटिल आजारावर यशस्वी उपचार करणे शक्य झाले.पत्रकार परिषदेस डॉ. प्रतिमा मरजक्के यांच्यासह सिद्धगिरी हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed.

error: Content is protected !!