कोल्हापूर: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सन १९४२ ते १९४८ या सात वर्षांच्या कालावधीत कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने सुमारे ५,००० निर्वासित पोलिश नागरिकांना आश्रय दिला होता. त्यांच्यासाठी कोल्हापूरजवळील वळीवडे येथे विशेष छावणी उभारण्यात आली होती. या कालावधीत कोल्हापूरच्या जनतेने या पोलिश नागरिकांना निर्वासित म्हणून नव्हे, तर आपल्या पाहुण्यांप्रमाणे सन्मानाने आणि आत्मीयतेने सांभाळले. या अनोख्या मानवतावादी नात्यातून दोन्ही समाजांमध्ये चिरंतन ऋणानुबंध निर्माण झाले. त्यातून अनेक ऐतिहासिक वस्तू, छायाचित्रे, दस्तऐवज आणि आठवणींचा अमूल्य ठेवा आजही दोन्ही देशांमध्ये जतन केला गेला आहे.
याच ऐतिहासिक मैत्रीचा गौरव करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने दिनांक ८ ऑगस्ट रोजी पोलंडचे उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ कोल्हापूर भेटीवर येत आहे. या शिष्टमंडळामार्फत त्या काळातील अनेक दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू, छायाचित्रे आणि स्मृतिचिन्हे वळीवडे येथे साकारण्यात येत असलेल्या पोलिश संग्रहालयासाठी सप्रेम भेट म्हणून प्रदान करण्यात येणार आहेत.या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर भागातील नागरिकांना भावनिक आवाहन केले आहे की, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील वळीवडे पोलिश छावणीशी संबंधित आपल्या कुटुंबाकडे जतन केलेली छायाचित्रे, पत्रव्यवहार, वस्तू, दस्तऐवज किंवा अन्य ऐतिहासिक आठवणी असल्यास संभाजीराजे छत्रपती यांचे कार्यालय, नवीन राजवाडा, कोल्हापूर (संपर्क : +91 96230 08777) येथे जमा कराव्यात.
नागरिकांनी दिलेल्या या ऐतिहासिक वस्तूंचे योग्य जतन करण्यात येईल आणि त्या संग्रहालयामध्ये प्रदर्शित करून भारत–पोलंड मैत्रीचा हा अमूल्य वारसा भावी पिढ्यांसाठी जपला जाईल. कोल्हापूरच्या मानवतेची आणि उदात्त परंपरेची साक्ष देणारा हा ठेवा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल.
