
पीएनजी ज्वेलर्सतर्फे आयोजित दाजीकाका गाडगीळ करंडक या एकांकिका स्पर्धेत रंगपंढरी पुणे च्या निरूपण ह्या एकांकिकेने पहिले पारितोषिक पटकावले , तर नाट्यमल्हार प्रतिष्ठान अहमदनगरच्या रंगबावरी ह्या एकांकिकेला दुसरे आणि रुबरु प्रॉडक्शन मुंबईच्या घरवाले दुल्हनिया दे जायेंगे ह्या एकांकिकेला तिसरे स्थान मिळाले. दाजीकाका गाडगीळ करंडकच्या चौथी आवृत्तीची अंतिम फेरी रविवारी भरत नाट्य मंदिर येथे पार पडली. पारितोषिक वितरण कार्यक्रमात पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ , स्पर्धेचे समन्वयक व प्रसिद्ध दिग्दर्शक अजय नाईक, परीक्षक मंडळाचे सदस्य अभिनेते,लेखक व दिग्दर्शक प्रविण तरडे, लेखक आशुतोष परांडकर,सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे उपाध्यक्ष व कलादिग्दर्शक अमित फाळके आणि लेखिका,दिग्दर्शिका व अभिनेत्री राधिका काकतकर इंगळे
उपस्थित होते. यावेळी अभिनेते अंकुश चौधरी , शिवानी सुर्वे , पल्लवी पाटील यांसह आगामी मराठी चित्रपट ट्रिपल सीट ची संपूर्ण टीमने संवाद साधला.यावर्षी दाजीकाका गाडगीळ करंडकला महाराष्ट्र, गोवा आणि मध्य प्रदेशमधून तब्बल १५० संघांसह प्रचंड प्रतिसाद मिळाला.खऱ्या अर्थाने भौगोलिक सीमा रेषा ओलांडत देशभरातील वेगवेगळ्या भागातील रंगभूमीच्या कलाकारांना हिंदी,मराठी,इंग्रजी नाटकांसाठी आपले प्रेम आणि कौशल्य दाखविण्यासाठी एक व्यासपीठ मिळवून दिले आहे. दिग्दर्शन,अभिनेता,अभिनेत्री,नेपथ्य, सांघिक आणि प्रकाश योजना अशा वेगवेगळ्या प्रकारात पारितोषिके देण्यात आली. विजेत्यांना प्रमाणपत्र, रॊख रक्कम आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.

Leave a Reply