
कोल्हापूर: कोल्हापुरातील रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक बेजार आहेत. परतीच्या पावसानंतर रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. पण कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचे पाऊल कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीने उचलण्यात आले आहे. त्यासाठी दाभोळकर कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन करून महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. लवकरात लवकर महापालिकेने नवीन रस्ते करण्याचे काम हाती घेतले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. यामध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मध्यरात्रीपासूनच महापालिकेच्या इमारतीस रिक्षा व वाहनांचा घेराव घालणार असल्याचे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष अभिषेक देवणे यांनी सांगितले.आंदोलनास वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले, विजय गायकवाड, अशोक जाधव, निलेश हंकारे आदी उपस्थित होते.रास्ता रोको मुळे परिसरात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
Leave a Reply