
कात्यायनी म्हणजे करवीरची दक्षिण द्वार देवता. बालिंगे गावची ग्रामदेवता! ( बालिंगा गाव पूर्वी कळंबा तलावाच्या काठावर होते पण कळंब्याचे पाणी कोल्हापूर शहराच्या पिण्यासाठी वापरायचे ठरल्यावर हे गाव संपूर्ण पणे रंकाळ्याच्या पुढे पुनर्वसित करण्यात आले. आजही बालिंगे गाव कात्यायनीलाच ग्राम देवता मानते) कोल्हासूराचा दक्षिण द्वाररक्षक असणा-या रक्तबीजाचा वध करण्यासाठी श्रीमहालक्ष्मीने भैरवाला पाठवले पण आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून नवा असूर प्रकट करणारा रक्तबीज भैरवाला आवरेना तेंव्हा त्यानं कात्यायनीला साद घातली. ती पाताळमार्गाने अमृताचा ओघ घेऊन भूमीवर आली ते कुंड आजही तिच्या समोर आहे. हाच जयंतीचा उगम . महाकालीच्या सहाय्याने रक्तबीजाला मारून कात्यायनी इथे उत्तराभिमुख विराजमान आहे. कात्यायनी दर्शनाने व रामकुंडाच्या स्नानाने भगवान परशूराम मातृहत्या व गोत्र वधाच्या पापातून मुक्त झाले. केवळ एक रक्षक देवता एवढीच कात्यायनीची ओळख नाही. कोल्हासूराला दिलेल्या वराप्रमाणे शंभर वर्षासाठी महालक्ष्मी हे क्षेत्र सोडून गेली असता तीनेच भक्तांचा सांभाळ केला. कात्यायनी कृपेनेच गोपिकांना श्रीकृष्ण मिळाले म्हणून आजही विवाह लवकर व्हावा आणि मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून कात्यायनीच दर्शन घेऊन साकडं घातल जातं. सोन्याच्या आरतीत दिवे उजळून महालक्ष्मीची आरती करण्याचा अधिकार चौसष्ट योगिनींसह कात्यायनीचाच आहे. आजही कोल्हापूर च्या दक्षिणेला १० कि.मी. वर गारगोटी रस्त्यावर डोंगरात कात्यायनीचे मंदिर आहे. जिथे देवी तांदळा (स्वयंभू पाषाण ) रूपात विराजमान आहे. दर अमावस्येला इथे महाप्रसाद असतो.
साक्षात शिवाचा तमोगुण अंश म्हणजे वेताळ तो भूतगणांचा अधिपती. श्री देवांना औरस संतती होणार नाही असा पार्वतीचा शाप आहे. पण भैरवाला पार्वतीचा पुत्र व्हायचे होते म्हणून शिव पार्वतीने करवीरात तारा आणि चंद्रशेखर नावाने अवतार घेतला. त्यांच्या उदरी कालभैरव आणि वेतालभैरवाचा जन्म झाला हाच वेताळ करवीरात शहराच्या पश्चिमेला राहून शहराचे रक्षण करतो . शिवाजी पेठेतील वेताळ माळावर वेताळाचे स्वयंभू मूर्ती स्थान आहे. त्याला करवीर माहात्म्यात अग्निजिव्ह असे नाव आहे. हाच वेताळ मूर्ती रूपात करवीर निवासिनीच्या दाराच रक्षण करायला पितळी उंब-याच्या डावी कडे उभा आहे . त्यालाच आपण विजय म्हणून ओळखतो. करवीर माहात्म्यात ‘काल वेतालकौ महाबली’ असा या मूर्तींचा उल्लेख आहे. वेताळ हा भूत गणांचा अधिपती सर्व तामसी तत्वांवर त्याचा अधिकार चालतो .कोकण आणि गोवा भागात वेतोबा नावाने त्याची चालुक्य काळापासून पूजा होते. अनेक गावांचा वेतोबा ग्रामदैवत आहे. चार फूटांहून उंच हातात खड्ग आणि पानपात्र घेतलेला वेतोबा पाहीला की आपोआपच आदरयुक्त भिती वाटते. अनेक ठिकाणी त्याला मोठे कातडी चपला अर्पण केल्या जातात. त्या घालून वेताळ गावाभोवती गस्त घालतो असे म्हणतात.
Leave a Reply