
कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महोत्सवाचे आयोजन मराठा स्वराज्य भवन व मराठा महासंघाच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक दसरा चौकात करण्यात आले आहे. हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. तसेच या महोत्सवामध्ये स्थानिक कलाकारांना व्यासपीठ दिले असून महिलांसाठी भरगच्च स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महोत्सवाचे उद्घाटन ३ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता महापौर सूरमंजिरी लाटकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे, सिनेकलावंत आनंद काळे उद्योजक सतीश कडुकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. महोत्सवात गृहपयोगी वस्तू उद्योग व व्यवसाय, ग्रंथप्रदर्शन,फुलझाडे फर्निचर, गाड्या यांचे ७५ स्टॉल्स भव्य मंडपात उभारण्यात आले आहेत. तसेच महिलांसाठी लोककला सादरीकरण, उखाणे स्पर्धा, टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे, मर्दानी खेळ, शाहिरी, मिमिक्री, सोलो डान्स, हिंदी मराठी गाण्यांचे कार्यक्रम, फेटा बांधणे प्रशिक्षण, ऐतिहासिक वेशभूषा, कविसंमेलन आणि खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. तसेच यावर्षी पासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राजर्षी शाहू सन्मान पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे असेही जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितले. तसेच या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने कर्ज मार्गदर्शन शिबीर आणि सर्व समाजातील विद्यार्थ्यांना विविध दाखला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला बबनराव रानगे, उत्तम जाधव, शंकरराव शेळके, संग्राम चव्हाण, नितीन हरगुडे, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.
Leave a Reply