शाहू कालीन कोल्हापूरच्या मिसळला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणाऱ्या ‘बावडा मिसळ’चे ९७ व्या वर्षात यशस्वी पदार्पण

 

कोल्हापूर/ प्रतिनिधी : सामान्यांपासून ते गर्भश्रीमंतांपर्यंत प्रत्येकाला चटकदार आणि झणझणीत मिसळ आवडतेच. पिझा आणि बर्गरच्या आधुनिक खाद्ययुगातही कोल्हापूरने आपल्या मिसळीची परंपरा जोपासली आहे. यात अग्रगण्याने नाव घेता येईल आणि कोल्हापूरला मिसळची ओळख करून देणार्‍या ‘बावडा मिसळ’ने आज ९७ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत शतक महोत्सवाकडे आपली वाटचाल सुरू केली आहे. मिसळ हा एकच खाद्यपदार्थ घेऊन संपूर्ण जगात त्याचा ब्रँड करणे ही सोपी गोष्ट नव्हती.
शाहू महाराजांच्या काळातील सर्वात जुनी मिसळ म्हणून ख्याती असणाऱ्या बावडा मिसळच्या उपहारगृहाची स्थापना १९२३ साली कोल्हापुरातील कसबा बावडा येथे शंकरराव चव्हाण यांनी केली. त्यांच्या पत्नी चिंगुबाई चव्हाण या शाहूमहाराजांच्या मुदपाकखान्यात गोड खांडवे हा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी जात होत्या. त्यांची ही गोड खांडवे संपूर्ण पंचक्रोशीत खूपच प्रसिद्ध होती. शंकरराव चव्हाण हे शाहू महाराजांच्या दरबारी दिवाणजीचे काम करायचे. शंकरराव आणि चिंगुबाई यांचे लग्न ही शाहू महाराजांनीच लावून दिले होते. मिसळ हा खाद्यप्रकार मुळात बावडा मिसळने जन्माला घातला असे म्हणता येईल. तिथून सुरू झाला ‘कोल्हापुरी झणझणीत मिसळ’ चा प्रवास.. शंकराव चव्हाण यांच्यानंतर दिनकरराव चव्हाण, दत्तात्रय चव्हाण आणि आता रत्नदिप चव्हाण आणि त्यांच्या मातोश्री रेखा चव्हाण. अशी तब्बल चार पिढ्यांची परंपरा या बावडा मिसळला लाभलेली आहे.
एका छोटेखानी हॉटेलमध्ये सुरू केलेल्या मिसळीची चव आजही तशीच ठेवण्याचा व ती जपण्याचा प्रयत्न चव्हाण कुटुंबियांनी केला आहे. तिखट म्हणजे कोल्हापूरी नव्हे, कोल्हापूरी ही एक चव आहे असे सांगत बावडा मिसळ बनवताना यात एकूण ६० घटक वापरले जातात. तर २५ प्रकारचे दर्जेदार कोल्हापुरी मसाले या मिसळची चव आणखीनच लज्जतदार बनवतात. मिसळीसाठी लागणारा शेव, चिवडा आणि मसाले हे चव्हाण कुटुंबीय स्वतः बनवतात. बाहेरून काहीही विकत आणले जात नाही. इथे काम करणारा पन्नास वर्षापासूनचा कर्मचारी वर्ग येणाऱ्या खवय्यांचे तितकेच आपुलकीने आदरातिथ्य आजही करत आहे. आज ९६ वर्षानंतर बावडा मिसळणे कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. अनेक पुरस्कारानेही बावडा मिसळ सन्मानित झाली आहे. कोल्हापुरात आलेला पर्यटक बावडा मिसळची चव चाखल्याशिवाय परत जात नाही. शंभराहून अधिक देशातील परदेशी नागरिकांनी येथे भेट देऊन आपले अभिप्राय नोंदवले आहेत. ब्रिटिश कालीन राजे महाराजे यांनीही बावडा मिसळ चाखली आहे. तसेच आपल्या देशाचे डॉलर कॉइन, नोटा गिफ्ट म्हणून देऊन गेले आहेत.
राज कपूर, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, हेमा मालिनी , आर के लक्ष्मण, नाना पाटेकर , माधुरी दिक्षित यांच्यासह अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रत्येक स्तरातील ख्यातनाम व्यक्तींनी इथल्या मिसळीचा आस्वाद घेत याचे कौतुक केले आहे. कोल्हापूर रातील बावडा मिसळ ला पेटंट मिळावे असेही अनेकांनी अभिप्राय दिला आहे याची सर्व अभिप्रायांची नोंद 360 वहीत गेले 20 वर्षांपासून नोंदी घेत आहेत. बावडा मिसळची गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी अश्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. 16 विविध पुरस्कारांनी बावडा मिसळ ला सन्मानित केले आहे. उत्कृष्ट सेवा, गुणवत्ता, नैसर्गिक घटक, आपुलकी, स्वादिष्टपणा याचे मिश्रण म्हणजेच कोल्हापुरातील ‘बावड्याची मिसळ’ ९७ व्या वर्षात पदार्पण करताना मिसळची चव तीच ठेवून त्यांच्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहे. ‘नवरत्न मिसळ’ ही वैशिष्ट्यपूर्ण मिसळची ओळख यानिमित्त करून देणार असल्याचे बावडा मिसळचे सर्वेसर्वा रत्नदिप चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सगळ्यांच्याच खिशाला परवडेल अशा माफक किमतीत ही मिसळ उपलब्ध होणार आहे. करवीर हे संस्थान असल्यापासून सर्वात पहिली व सुप्रसिद्ध मिसळ अशी ज्याची ख्याती आहे, अशा मिसळचा ब्रँड व्हावा यासाठी लोगो तयार करण्यात आला आहे. या लोगोचे अनावरण व उद्घाटन हॉटेलच्या वर्धापन दिनानिमित्त म्हणजे बुधवारी १ जानेवारी २०२० रोजी नूतन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मिसळच्या फ्रॅंचाईजी नेमण्यात येणार असून अजून काही खाद्यपदार्थ सुरू करण्याचा मानस आहे, असे रत्नदिप चव्हाण यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!