
धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने आणि ग्रामपंचायत नांगनूरच्या वतीने नांगनूर मध्ये महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर राबवण्यात आले. महिलांनी सबला व्हावे, त्यांच्या जीवनात आर्थिक सक्षमता यावी, यासाठी भागीरथी संस्थेच्या वतीने, जिल्हयातील गावागावांमध्ये महिलांना मोफत प्रशिक्षण दिलं जातं. त्याचाच एक भाग म्हणून नांगनूरमध्ये हे प्रशिक्षण शिबिर पार पडले. यामध्ये स्वयंरोजगारासाठी पुरक अशा विविध उत्पादनांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
भागीरथी महिला संस्थेच्यावतीने, गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर ग्रामपंचायतीतर्फे महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर राबवण्यात आले. या शिबिराला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रशिक्षिका गंधाली दिंडे यांनी महिलांना फिनेल, वॉशिंग पावडर, लिक्विड सोप, अगरबत्ती, बात सोप, क्लॉथ सोप, सेंट, चौपाटी पदार्थ, केक, हॅण्डवॉश या उत्पादनांची माहिती देवून, ही उत्पादने घरच्याघरी कशी बनवावीत आणि बाजार पेठेत कशा पध्दतीनं त्याची विक्री केली जाते. याबाबत दिंडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिकंही महिलांना दाखवण्यात आले. त्यानंतर रेश्मा पाटील यांनी उपस्थित महिलांना ब्युटी पार्लरबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ब्लिच, फेशियल, क्लिनअप, मेहंदी, आयब्रो, वॅक्सिंग याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली. घरच्या घरी महिला अशा प्रकारची उत्पादनं किंवा सौंदर्य प्रसाधनाशी संंबंधित व्यवसाय सुरू करून, अर्थाजन करू शकतात. स्वतःचा आणि कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महिलांनी अशा प्रकारच्या स्वयंरोजगाराचा मार्ग अवलंबला पाहीजे. महिलांच्या उद्योगासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्याचा लाभ घेवून महिलांनी लघु उद्योग सुरू करावेत, असं आवाहन यावेळी करण्यात आलं. तर शरयू भोसले यांनी निसर्ग सखी खत बास्केटबाबत उपस्थित महिलांना सविस्तर माहिती दिली. दुसर्या दिवशी महिलांना मसाले बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये पुलाव बिर्याणी मसाला, पावभाजी मसाला, गरम मसाला, मटण-चिकन मसाला, गोडा मसाला, कोकणी मसाला, सांबार मसाला, मिसळ मसाला यांचे प्रशिक्षण गंधाली दिंडे यांनी दिले. तर गीता भोसले यांनी, कापडी पिशव्या बनवण्याबाबतचे प्रशिक्षण उपस्थित महिलांना दिले. या कार्यक्रमाला सरपंच सुप्रिया कांबळे, उपसरपंच विकास मोकाशी, रेखा नार्वेकर, सुनिता लोहार, लक्ष्मी कांबळे, माधुरी कासारकर, सीमा मोकाशी, विद्या लोहार, ग्रामसेवक एस. बी. तोरस्कर यांच्यासह महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
Leave a Reply