
कोल्हापूर/ प्रतिनिधी: पश्चिम महाराष्ट्रात नुकताच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तीन मंत्रीपदे मिळाली. या तीनही मंत्र्यांच्यावतीने शासकीय विश्रामधाम येथे संयुक्तिक पत्रकार परिषद घेण्यात आली. गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित राहिले. तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेण्यात आले नाहीत. परंतु महाविकास आघाडीच्या सरकारने दोन लाखापर्यंतची कर्जे शेतकऱ्यांना माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. तसेच २६ जानेवारीपासून जिल्ह्यात सर्वत्र गरीब व सर्वसामान्य लोकांना परवडेल अशी दहा रुपयात शिवथाळी सुरू करणार आहे. तसेच दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिननिमित्त लोकांच्या समस्या शासकीय विश्रामधाम येथे अधिकाऱ्यांसोबत जाणून घेऊन आम्ही तिन्ही मंत्री या समस्यांचे निवेदन स्वीकारू व त्या त्या विभागांना पाठवून कमी कालावधीत त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न कर. एकूणच हे सरकार सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे असणार आहे. आम्ही सर्वसामान्य नागरिकच आहोत. पुन्हा रामराज्य येईल आणि सर्वसामान्यांचे सुशासन आणू आणि प्रलंबित विकास करू यासाठी आम्ही तीनही मंत्री कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
विरोधी पक्षाचे आमदार म्हणून गेलो आणि मंत्री म्हणून आलो, असे मिश्किल टिप्पणी देखील त्यांनी यावेळी केली. तसेच उद्धव ठाकरे भला व सच्चा माणूस असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षाने सतत टीका केल्यामुळे आम्हाला आमचे चांगले काम करता येईल याबद्दल विरोधी पक्षाचे आभारही मुश्रीफ यांनी मानले.
गेल्या पाच वर्षातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचे राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. थेट पाईपलाईन योजनेत प्राधिकरणाकडून माहिती घेऊन लवकरच प्रकल्पाला गती देणार आहे. शाहू मिल येथे लोकांच्या सूचना देऊन तेथील शाहू स्मारकाला चालना देणार तसेच समाधीस्थळाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. १९ जानेवारी रोजी त्याचा लोकार्पण सोहळा पार पडेल. सर्किट बेंच साठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच तोही प्रश्न मार्गी लावणार आहे. तीर्थक्षेत्र आराखडा तसेच महापालिकेच्या नगरोत्थानचा १७८ कोटींचा प्रस्ताव यामध्ये १०० कोटींचे रस्ते प्राधान्याने करण्यात येणार असल्याचे ही नामदार
पाटील यांनी सांगितले.
शिरोळ, हातकणंगले परिसराला महापुराचा जबरदस्त सामना करावा लागला. पंचनामे झाले परंतु त्याच्यामध्ये त्रुटी राहिल्या आहेत. आणि अजूनही लोकांना मदत मिळालेली नाही. कन्यागत पर्वाची कामेही अपूर्ण आहेत. ही सर्व कामे मंत्री या नात्याने करणे हे माझे कर्तव्य आहे, असे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.
अनुभव नसल्याने मागील सरकारने विकास केला नाही. महाराष्ट्राची तिजोरी रिकामी आहे अशी टीका होत असताना ती कशी भरायची आणि त्याचा वापर लोकांसाठी कसा करायचा हे चांगली माहिती आहे, असा टोलाही यावेळी हसन मुश्रीफ यांनी लगावला.
जिल्ह्यात कोणताही न्याय मागण्यासाठी मोर्चा व आंदोलनाचा आधार लोक घेतात. परंतु हे आंदोलन किंवा मोर्चे काढण्याआधी जर तो प्रश्न आमच्या कानावर घातला तर आम्ही त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करु. कोणाचाही आंदोलन किंवा मोर्चा दडपण्याचा आमचा हेतू नाही. लोकशाही मार्गाने सर्वांनाच तो हक्क दिलेला आहे, असेही सतेज पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला महापौर सूरमंजिरी लाटकर, आमदार चंद्रकांत जाधव,आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह सह महविकास आघाडीचे मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply