
कागल:कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ऐतिहासिक शोभायात्रेचे व चित्ररथ यांच्या मिरवणुकीचे आयोजन केले होते. जुन्या व इतिहासकाळात घेऊन जाणाऱ्या या शोभायात्रेत कागलकर चांगलेच रमले.कागल नगर परिषद, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने आयोजित या शोभायात्रेत उंट- घोड्यासह पाचशेहून अधिक मावळेही पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.याबाबत अधिक माहिती अशी, शहराच्या उत्तरेला असलेल्या डी. आर. माने महाविद्यालयापासून ही शोभायात्रा सुरू झाली. त्यानंतर बस स्टँड जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मुख्य बाजारपेठेतून ही मिरवणूक गैबी चौकाकडे निघाली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या शोभायात्रेचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद सदस्य युवराज बापू पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, नगराध्यक्ष सौ. माणिक माळी, उपनगराध्यक्ष सतीश घाडगे आदी प्रमुखांच्या हस्ते झाले.या मिरवणुकीच्या सुरुवातीला फुलांनी सजवलेली छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी होती, पालखीच्या पाठोपाठ मुलांचा मल्लखांब व व मुलींचा दोरखंड लक्ष वेधून घेत होता. तसेच मुलांची व मुलींची स्वतंत्र ढोल पथकेही या शोभायात्रेत होती. घोड्यावर आरूढ झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजां पाठोपाठ शिवाजी महाराजांच्या घोडदळाचे दर्शनही प्रकर्षाने लक्ष वेधून घेत होते. तसेच मिरवणुकीतील वाघ्या-मुरळी नृत्य आणि गोंधळ नृत्य ही प्रेक्षकांचे खास आकर्षण ठरले. कोळीगीतासह तलवारबाजी आणि प्राचीन काळातील दांडपट्टा या मिरवणुकीत होता. लेझीम पथकासह स्वतंत्र हालगी पथक आणि शिवकालीन ऐतिहासिक पात्रांचाही समावेश या शोभायात्रेमध्ये होता. खास ऐतिहासिक वेशभूषेतील शेलापागोटे बांधलेल्या दोनशेहून अधिक मावळ्यांचे संचलनही या मिरवणुकीचे आकर्षण होते. चेन्नईतील 60 जणांचे चंडावाद्यांचे पथक एक सुरात ढोल वादन करीत होते.
Leave a Reply