
कोल्हापूर:मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने, कर्ज माफी योजनेच्या नावाखाली शेतकर्यांची फसवणूक केली आहे. त्याशिवाय महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे, असा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय आणि करवीर तहसिलदार कार्यालयासमोर, भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन केले. सातबारा कोरा करून, शेतकर्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन पाळावे, अन्यथा सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी दिला.
महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना-कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सत्तेवर येताना, किमान समान कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामध्ये शेतकर्यांचा सातबारा कोरा करून, त्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्याची घोषणा केली होती. मात्र तीन महिने झाले तरी शेतकर्यांना कर्ज माफीचा लाभ मिळालेला नाही. अशातच राज्यातील महिलांवरील अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गृह खाते महिलांचे संरक्षण करण्यास पुर्णपणे अपयशी ठरले आहे. विधानसभा निवडणूकीत भाजप-शिवसेनेला जनादेश मिळालेला असतानाही, भाजपची फसवणूक करून शिवसेनेने कॉंग्रेेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सत्ता मिळवली. या आघाडी सरकारने शेतकर्यांची सुध्दा फसवणूक केली आहेत, असा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्यावतीने राज्यातील सर्व तहसिलदार कार्यालयांसमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय आणि करवीर तहसिलदार कार्यालयासमोर भाजपचे कार्यकर्ते मोठया संख्येने आंदोलनासाठी जमले होते. नारी तेरे सन्मान मे, भाजपा मैदान मे….. अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ आंदोलन पुकारल्याचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक यांनी संागितले. संपुर्ण कर्ज माफीची घोषणा करून प्रत्यक्षात केवळ पीक कर्ज माफी जाहीर केलीय. विहीर खुदाई, ट्रॅक्टर, कृषी अवजारं, कुक्कुटपालन, खावटी कर्ज, जनावरं खरेदी यासाठी शेतकरी कर्ज घेतात. त्यामुळं सरसकट कर्ज माफी देवून शेतकर्यांचा सातबारा कोरा करणं गरजेचे होते. मात्र या सरकारने शेतकर्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसली आहेत. फडणवीस सरकारने शेतकर्यांचं थकीत दिड लाख रूपयांचे कर्ज माफ केले होते. जुन ेकर्ज भरल्याशिवाय शेतकर्यांना नवीन कर्ज मिळत नाही. पीक कर्ज माफीच्या आदेशातील जाचक अटीमुळे जिल्हयातील ९० टक्के शेतकरी वंचित राहणार आहेत. तर प्रामाणिकपणे कर्ज शेतकर्यांना सरकारने वार्यावर सोडले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी केली. महाराष्ट्र सरकारने शेतकर्यांना सरसकट कर्ज माफी देण्यासाठी अर्थ संकल्पामध्ये तरतुद करावी, अशी मागणी माजी खासदार महाडिक यांनी केली.
Leave a Reply