
कोल्हापूर: महाराष्ट्र शासन पुरस्कृत व कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आठवा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 12 ते 19 मार्च दरम्यान होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी 12 मार्च रोजी होणार आहे. हंगेरीच्या कॅप्टिव्ह सिनेमाने महोत्सवाचा पडदा उघडणार असून मल्याळी दिग्दर्शक जयराज यांना यावेळी कलामहर्षी बाबुराव पेंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती असणार असून आयनॉक्स थेटर येथे सायंकाळी सहा वाजता हा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे, अशी माहिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी आणि सचिव दिलीप बापट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच चित्रपट संकलन विद्याधर पाठारे यांना यावर्षीचा आनंदराव पेंटर पुरस्कार दिला जाणार आहे. 19 मार्च रोजी महोत्सवाची सांगता होणार असून या सांगता सोहळ्यामध्ये त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे प्रमुख प्रकाश मगदूम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. 15 मार्च रोजी दुपारी अडीच वाजता महोत्सवांतर्गत लघुपट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येईल. माय मराठी विभागातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार व कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कार उद्योजक नितीन वाडीकर यांनी पुरस्कृत केलेला आहे, असेही चंद्रकांत जोशी यांनी सांगितले.
Leave a Reply