सीपीआरच्या क्षमतेनंतर कोरोनासाठी डॉ.डी.वाय पाटील रुग्णालय देणार सेवा

 

कोल्हापूर : सीपीआरच्या क्षमतेनंतर कोरोना रुग्णांसाठी डॉ.डी वाय पाटील रुग्णालय वैद्यकीय सेवा देणार असल्याचे डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी मान्य केले आहे. कोरोनासाठी सीपीआर राखीव केल्याने या ठिकाणी येणाऱ्या इतर रुग्णांवर सीपीआरप्रमाणेच मोफत उपचार करण्याचा भार शहरातील खासगी रुग्णालयांनी उचलला आहे. राज्यातील आरोग्य सेवेसाठी हे प्रेरणादायी असल्याचे सांगून पालकमंत्र्यांनी सर्व खासगी रुग्णालयांचे अभिनंदन केले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री श्री. पाटील यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांशी संवाद साधून चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, प्रांताधिकारी वैभव नावडकर, उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, समन्वयक संजय शिंदे आदी उपस्थित होते. अन्य उपचारांसाठी सीपीआरमध्ये येणारे रुग्ण सेवा रुग्णालयातून संदर्भ चिठ्ठीद्वारे आपल्याकडे पाठविण्यात येत आहेत. या रुग्णांवर सीपीआरप्रमाणेच सामाजिक बांधिलकीतून मोफत उपचार करणे आवश्यक आहे. सकृतदर्शनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पीपीई कीट वापरण्याचे निर्देश आहेत. बाजारातून उपलब्ध करण्याचा आमचाही प्रयत्न सुरु आहे. आपणही आपल्यास्तरावर तसे प्रयत्न करावेत. यावर डॉ.आशा जाधव म्हणाल्या, इंडियन मेडिकल असोसिएशनने कालच यादी मागवून घेतली आहे. पीपीई कीट ते पुरवणार आहेत.
ही अभिनंदनीय बाब असल्याचे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, पहिल्या टप्प्यासाठी सीपीआर, सीपीआरच्या रुग्ण क्षमतेनंतर दुसऱ्या टप्प्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय रुणालय सेवा देणार आहे. आणि तिसऱ्या टप्प्यासाठी शिवाजी विद्यापीठातील वसतीगृहे अशी संभाव्य प्रादूर्भावाविषयी पूर्वतयारी केली आहे. खासगी रुग्णालयांकडे उपचारासाठी येणाऱ्या रुगणांमध्ये कोरोना संशयित लक्षणे आढळल्यास त्यास थेट सीपीआरला पाठवावे. असा रुग्ण्‍ सीपीआरला जाण्यास मनाई करत असल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे. शासनामार्फत आपणा सर्वांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असेही ते म्हणाले.
सेवा रुग्णालयाच्या संदर्भ चिठ्ठीवर मोफत उपचार व्हावेत- जिल्हाधिकारी सेवा रुग्णालयातून संदर्भ चिठ्ठीद्वारे आपल्याकडे रुग्णाला पाठविण्यात आल्यानंतर त्याच्यावर मोफत उपचार व्हायला हवेत. त्याबाबत आपल्या कर्मचारी वर्गाला तशा सूचना द्याव्यात असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक हे एमओयू तयार करतील आणि आपल्याला पाठवतील. मानवतेच्या भावनेतून तुम्ही सर्वांनी नागरिकांना अशावेळी मदत करावी. जे उपचार सीपीआरमध्ये केले जातात तसेच आपल्याकडूनही करण्याची अपेक्षा आहे. रुग्णांकडून पैसे घेत असल्याचे समजल्यास असे रुग्णालय कर्मचारीवर्गासह अधिग्रहीत करण्यात येईल.
खासगी रुग्णालय सुरु ठेवणाऱ्यांचे अभिनंदन- डॉ. कलशेट्टी
खासगी रुग्णालय स्वत:हून उघडून जे डॉक्टर्स सेवा देत आहेत त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. ज्यांनी अजूनही सुरु केले नसतील त्यांनीही सुरु करावेत अशा सूचनाही आपण आपल्या सहकार्यांना द्याव्यात असे सांगून महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, सध्याच्या कालावधीत आपण सर्वांनी सहकार्य करावे. जे रुग्ण आपल्याकडे येतील त्यांच्यावर योग्य उपचार करावेत. त्यांचा प्रवास इतिहास, लक्षणे असतील तरच अशा रुग्णांना सीपीआरला पाठवा असेही ते म्हणाले.डॉ. अर्जून आडनाईक, डॉ. अभ्यंकर, डॉ. आशुतोष देशपांडे, डॉ. पद्मराज पाटील, डॉ. विनायक शिंदे, डॉ. संदीप साळोखे, डॉ. हर्षवर्धन जगताप, डॉ. शुभांगी पार्टे, डॉ. सुजित पाटील, डॉ. संदीप पाटील, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. मंजुळा पिशवीकर, डॉ. उल्हास दामले, डॉ. जयंत वाटवे आदींनी यामध्ये सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!