कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व कोल्हापूर जिल्हा सहकारी कर्मचारी संघटना आयटक यांच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून उत्सव मल्टीपर्पज हॉल गोकुळ शिरगाव येथे महिला मेळावा व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व संचालक मंडळ, आयटक नॅशनल कौन्सिल सदस्या कॉ.बबली रावत, प्रा.स्मिता केरिमाने व मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचे मोठे योगदान असते. त्याचप्रमाणे गोकुळ दूध संघाच्या प्रगतीमध्येही महिला दूध उत्पादकांचा मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील अनेक महिला दुग्ध व्यवसायात सक्रियपणे काम करत असून त्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. महिलांनी मनापासून प्रयत्न केले तर दुग्ध व्यवसाय अधिक यशस्वी होऊ शकतो, याची अनेक उदाहरणे आपल्या आसपास पाहायला मिळतात. गोकुळ दूध संघाने नेहमीच दूध उत्पादकांच्या हितासाठी विविध योजना राबवल्या आहेत. महिला दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेली ‘नारी सन्मान विमा योजना’ ही महिला दूध उत्पादकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या कुटुंबाला आधार देणारी योजना ठरणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर “मी कोण?” या विषयावर कॉम्रेड बबली रावत यांनी व्यक्तिमत्वाची जाणीव, आत्मभान आणि समाजातील आपली भूमिका याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच दुसऱ्या सत्रात “सोहळा आनंदी आयुष्याचा” या विषयावर प्रा. स्मिता केरीमाने यांनी सकारात्मक विचार आणि आनंदी जीवनशैली याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच शाहीर सदाशिव निकम व सहकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला व विविध प्रभोधनात्मक व मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोकुळ दूध संघ कर्मचारी व अधिकारी त्यांच्या सौभाग्यवती व कन्या उपस्थित होत्या. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, अजित नरके, रणजीतसिंह पाटील, प्रकाश पाटील, बाळासो खाडे, कॉ.बबली रावत, पद्मजा आपटे, कॉ.स्मिता केरिमाने, कॉ.दिलीप पोवार, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, संघाचे अधिकारी प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, डॉ.प्रकाश साळुंके, कर्मचारी पतसंस्था चेअरमन माधुरी बसवर, गीता मोरे, डॉ.अश्विनी गाणे, तुनजाराणी घाटगे, तुप्ती देसाई, पूजा चिंगरे, राजश्री खाडे,कविता मगदूम, रुपाली देसाई, शुभदा पाटील, सरिता चव्हाण, सरिता मदनाईक, तृप्ती मदने, शुभदा जोशी, सुनिता कांबळे, गीता उत्तुरकर, बाजीराव राणे, संघटनेचे सर्व पदाधिकारी, महिला कर्मचारी उपस्थित होते.
