
कोल्हापूर : वीज बिलातील स्थिर आकाराचे सरकारकडून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय उद्योगधंदे सुरू होणार नाहीत, असा निर्णय उद्योगपतींच्या बैठकीत घेण्यात आला.
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशनच्या सभागृहात आज दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौंड्रीमेनच्या कोल्हापूर विभागाची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.शासनाच्या निर्णयानुसार २० एप्रिलपासून सर्वच उद्योग सुरू करण्याचा निर्णय उद्योगपतीनी घेतला, मात्र शासनाच्या जाचक अटी आणि झूम अपच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत तीन मेनंतर उद्योग सुरू करण्याचा निर्णय झाला होता.
दरम्यान, आज पुन्हा झालेल्या बैठकीत वीज बिलातील स्थिर आकाराविषयी चर्चा झाली. आयआयएफचे विभागीय अध्यक्ष सुमित चौगुले यांनी सांगितले की, फाऊंड्री उद्योग जीएसटीच्या वरच्या स्लॅबमधील उद्योग आहे. सरकारला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देणारा हा उद्योग आहे. यामुळे लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांसाठी स्थिर आकाराला मुदतवाढ न देता तो माफ करण्यात यावा. शेजारील गुजरात राज्यात असा कर माफ करण्यात आला आहे. इतरही राज्ये तसा निर्णय घेत आहेत. त्यादृष्टीने राज्य सरकारने तसा निर्णय घ्यावा. यावेळी आयआयएफचे उपाध्यक्ष रवींद्र पाटील, संजय पाटील, सुरजित पवार, सतीश कडूकर, समीर पाटील, प्रसाद मंत्री, समीर परीख, भरत जाधव, विनय खोब्रे, शरद तोतला आणि अभिजित नाईक आदी उपस्थित होते.
Leave a Reply