
कोल्हापूर : समाजातील गरीब, दुर्बल घटकांच्या उदरनिर्वाहासाठी बँक खात्यावर रक्कम जमा करून लॉकडाऊनचा कालावधी सुसह्य करावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्येक घटकाला नुकसान सहन करावे लागले आहे. त्या अनुषंगे श्री. जाधव यांनी सर्वच घटकांना मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, लॉकडाऊन कालावधीत शेतीवर कोणतेही निर्बंध नसले तरी वाहतुकीच्या असुविधेमुळे कृषिमालाचा उठाव झाला नाही. भाज्या, फळे अगदी शेतातच कुजून गेली. त्यामुळे कृषिमालाचा तत्काळ उठाव करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जनधन खात्यासारख्या माध्यमातून आज प्रत्येकाचे बँकेत खाते उघडले गेले आहे. प्रत्येकाच्या खात्यावर काही रक्कम वर्ग करावी शिवाय भांडवलासाठी कमी व्याजदराने कर्ज मिळावे. सर्वच रिक्षा-टॅक्सीधारक चालक-मालक यांच्या खात्यावर काही रक्कम वर्ग करावी. मंदी आणि त्यानंतर लागू झालेला लॉकडाऊन यामुळे उद्योजकांना आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार करणे कठीण झाले आहे. अशावेळी ईएसआय फंडातून कामगारांच्या पगाराची तरतूद करावी.
ते म्हणाले, महावितरण कंपनीमार्फत लॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिल स्थिर आकार रद्द करून जेवढा वीज वापर झाला आहे तेवढेच बिल द्यावे. उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यांना अत्यावश्यक खर्च करणेकरिता काही मदत निधी देणे, उद्योग पूर्ववत स्थितीमध्ये येईपर्यंत करांमध्ये सवलती, बिनव्याजी कर्जाची सोय करण्यात यावी, कोल्हापूर जिल्हा सोने-चांदी उद्योगातील उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. या उद्योगातील कामगारांची संख्या हजारात आहे. त्यांच्यासाठी अंगभूत कौशल्ये विकसित करण्यासाठी ऑनलाईन, सेमी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करावेत. ट्रक-टेम्पो एकाच जागी थांबून आहेत, त्यांना कर्जाचे हप्ते भरण्यास सवलत देण्याची मागणीही श्री. जाधव यांनी केली आहे. आधार कार्डच्या आधारे महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाचे रेशन कार्ड तयार करण्यात यावे, ज्यायोगे अशा आपत्तीच्या वेळी कोणी वंचित राहणार नाही.ते म्हणाले, अशा प्रकारची सर्वच घटकांना समावेशक मदत करण्यासाठी राज्य शासनाबरोबर केंद्र शासनाकडे शिफारस करून राज्य-केंद्राच्या निधीतून कोणताही घटक वंचित राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे लागेल.
Leave a Reply