
कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जाणीवपूर्वक अवमुल्यन केल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला आहे. त्याबद्दल पक्षाच्यावतीने श्री. फडणवीस यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकाराबद्दल श्री फडणवीस यांनी माफी मागण्याची मागणी ही पक्षाने केली आहे.यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, आज बुधवार दि सहा मे रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची पुण्यतिथी आहे. त्याअनुषंगाने अभिवादन करण्यासाठी श्री. फडणवीस यांनी टाकलेल्या फेसबुकच्या पोस्टमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख थोर सामाजिक “कार्यकर्ते” असा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना खऱ्याअर्थाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज कळले नाहीत, अशी टीकाही या पत्रकात केली आहे.निषेधाच्या या पत्रकात पुढे म्हटले आहे, खऱ्या अर्थाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे पुरोगामी चळवळीचे अध्वर्यू होते, त्यामुळे प्रतिगामी शक्ती नेहमीच त्यांचा द्वेष करीतच आल्या आहेत. श्री फडणवीसाकडून झालेला हा एकेरी उल्लेख सुद्धा त्याचेच द्योतक आहे. म्हणजेच श्री फडणवीस यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जाणीवपूर्वक अवमूल्यन केले आहे. वास्तविक; राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे दूरदृष्टीचे, समतेचे आणि लोक कल्याणकारी असे महान ऋषितुल्य राजे असताना त्यांचा उल्लेख “कार्यकर्ते” असा एकेरी होणे हा आम्हा जनतेचा अवमान आहे. हा अपमान आम्ही शाहूप्रेमी जनता कदापिही सहन करणार नाही
Leave a Reply