वाढदिवसानिमित्त 1 लाख होमिओपॅथिक औषध, 10 हजार सॅनिटायझर स्प्रे बॉटल्स वाटणार:आ.ऋतुराज पाटील

 

कोल्हापूर : गेली दोन महिने सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी 31 मे रोजी होणारा माझा वाढदिवस साजरा करणार नाही. वाढदिवसाच्या निमित्ताने कोल्हापूर दक्षिण मतदार संघ तसेच कसबा बावडा येथील घरोघरी रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या 1 लाख होमिओपॅथिक औषध बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी 10 हजार सॅनिटायझर स्प्रे बॉटल्स देण्यात येणार आहेत. रक्तदान करु इच्छिणाऱ्या तरुण पिढीसाठी गुगल फॉर्मच्या माध्यमातून रक्तदात्यांची डिरेक्टरी तयार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या दोन महिन्यांच्या काळात डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून आम्ही गरजूंना वेगवेगळ्या मार्गाने मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येकजण आपआपल्या पध्दतीने प्रयत्न करीत आहे. यामध्ये स्वत:ची रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ही गोष्ट लक्षात घेवूनच कोल्हापूर दक्षिण मतदार संघ आणि कसबा बावडा येथे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या ‘आर्सेनिक एल्बम-30 C’ या भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने मान्यता दिलेल्या होमिओपॅथिक औषधाचे वाटप करण्यात येणार आहे. कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी योग्य प्रकारे सॅनिटायझेशन करणे महत्वाचे आहे. सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक एकमेकाच्या संपर्कात येत असतात. त्यावेळी जास्त काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. ही गोष्ट लक्षात घेवूनच दक्षिण मतदारसंघातील केशकर्तनालय, दळप-कांडप गिरण, छोटे व्यावसायिक याबरोबरच ग्रामपंचायत, दुध डेअरी, सेवा सोसायटी या सारख्या सार्वजनिक ठिकाणी अर्धा लिटर क्षमतेच्या 10 हजार सॅनिटायझर स्प्रे बॉटल देण्यात येणार आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर घेण्याची संकल्पना अनेक तरुण मित्रांनी माझ्याकडे मांडली होती. पण कोरोनाच्या संकटात सोशल डिस्टंसिंगचा मुद्दा लक्षात घेवून रक्तदान शिबीर ऐवजी रक्तदान करु इच्छिणाऱ्यांची डिरेक्टरी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी गुगल फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणार आहे.ही यादी रक्तपेढीकडे दिली जाईल. यामुळे ज्यांना रक्त हवे असेल ते रक्तपिढीच्या माध्यमातून या रक्तदात्यांना संपर्क करु शकणार आहेत.जास्तीत जास्त युवा पिढीने रक्तदाता म्हणून या गुगल फॉर्मवर नोंदणी करावी, असे आवाहनही आ.पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!