
कोल्हापूर : जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना विषाणूचे संकट आजही शहरवासीयांवर घोंगावत आहे. एकीकडे केंद्र व राज्य शासन उपलब्ध निधीचा वापर कोरोना संकटावर मात करण्यासाठी करत असताना, कोल्हापूर महानगरपालिका मंजूर निधीचा वापर लोकांच्या आरोग्याशी निगडीत सोयी सुविधा, उपचार यंत्रणा राबविण्यात करण्याऐवजी विकास कामांवर करीत आहे. पुढील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने या निधीचा वापर करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्यापेक्षा राजकीय महत्त्वकांक्षा कितपत योग्य आहे. वास्तविक सदर विकास कामांना स्थगिती देवून राज्य शासनास सदर निधी परत करून आरोग्य यंत्रणेवर भर देण्याचा एक वेगळा आदर्श कोल्हापूर महानगरपालिकेस निर्माण करता आला असता. परंतु, असे होताना दिसत नाही. या विकास कामांचा निधी खर्ची पाडण्यास कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनास इतकी घाईगडबड का? नागरिकांच्या जिवापेक्षा विकास कामास प्राधान्य देणे, हे शोभनीय नाही. त्यामुळे आधी नागरिकांच्या आरोग्यासाठी हितकारक गोष्टींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने मुलभूत सोयीसुविधा अंतर्गत मंजूर झालेला २५ कोटी रुपयांचा निधी कोरोना यंत्रणेवर खर्च करावा, अशा सुचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिल्या. यावर बोलताना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी, सदर २५ कोटी निधी वापरण्याकरिता महासभेची परवानगी आवश्यक असून, मागणी योग्य असल्याचे सांगितले. यासह शासनाचे निर्देश बघून कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. यावर बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, आपण स्वत: नगरविकास मंत्री मंत्री महोदयांशी याबाबत बोललो असल्याचे सांगत आयुक्त या नात्याने निधी वापरण्याचे अधिकार असल्याचे सांगितले.यासह आयुक्त आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी, पूरस्थितीबाबत सर्व उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे. नालेसफाई, आपत्कालीन विभाग सुसज्ज करण्यात आले आहे. महापालिका परिचारिका आणि प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नाबाबत लवकरच बैठक घेवू. यासह महापालिकेतील बदल्यांची प्रक्रिया सुरु असून, कामकाज सुरळीत झाल्यानंतर याही प्रश्नाचा निपटारा होईल, असे सांगितले.
Leave a Reply