
कोल्हापूर : अलीकडेच प्रसारमाध्यमांनी केलेल्या चाचण्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील सर्वोत्कृष्ट पाच मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. नेमकी हीच गोष्ट माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खटकलेली दिसतेय, अशी शेरेबाजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. पंधरवड्यापूर्वी मौन आणि अध्यात्माची पुस्तके वाचण्याचा मी दिलेला सल्ला त्यानी धुडकावलेला दिसतोय, अशी मिश्कीलिही मंत्री मुश्रीफ यांनी केली आहे.मंत्री श्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, मी काही दिवसांपूर्वी माझे मित्र व राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘मौनम् सर्वार्थ साधनम्’, ‘मौन व्रतामुळे शांती लाभते’ आणि ‘प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय’ अशी तीन महत्त्वाची पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी ती पुस्तके काही वाचलेली दिसत नाहीत, त्यांनी माझा सल्ला धुडकावून लावलेला दिसतोय. आजच त्यांनी प्रसारमाध्यमांमधून परवा कोकणात जे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेलं आहे, त्यासाठी शंभर कोटी रुपयांची मदत अतिशय तोकडी आहे आणि राज्य सरकारची अवस्था पॉलिसी पॅरालिसीस नाही तर ॲक्शन पॅरालीसीससुद्धा आहे, अशा प्रकारची टीका केलेली आहे. या वादळाच्या नुकसानीची ज्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली, त्या क्षणाला त्यांनी शंभर कोटी रुपये भरपाईची घोषणा जाहीर केली. वास्तविक पंचनामे झाल्याशिवाय अशी मदत देता येत नसते. परंतु विजेचे ट्रांसफार्मर आणि जनतेच्या अत्यावश्यक सेवांसाठी तात्काळ मदत म्हणून शंभर कोटी रुपये जाहीर केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते. तसेच तातडीने पंचनामे करू आणि जेवढे नुकसान झाले असेल तेवढे सर्वच्या सर्व नुकसान सरकार देण्याचा प्रयत्न करेल , असेही जाहीर केले होते. असे असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस अशा प्रकारची वक्तव्ये आणि टीका करीत आहेत, हे निश्चितच हास्यास्पद आहे.जगातील दोनशेहून अधिक राष्ट्रीय कोरोना संसर्गाची संघर्ष करीत असताना, झगडत असताना ज्या पद्धतीने महाराष्ट्रात कोरोनाचे हे संकट नियंत्रणात आणले आहे. त्यासह गेल्या सहा महिन्यातील कामाबद्दल प्रसारमाध्यमांनी केलेल्या चाचण्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील सर्वोत्कृष्ट पाच मुख्यमंत्र्यांनी पैकी एक आहेत, असा गौरव केलेला आहे. मला वाटतंय की हीच गोष्ट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना खटकलेली असावी.ज्या -ज्या वेळेला कोरोना संसर्गाचे रुग्ण कमी होतात किंवा मृत्यूचा आकडासुद्धा कमी असतो. त्यावेळी श्री फडणवीस हे उसळून उठतात आणि या आकडेवारीमध्ये लपवाछपवी असल्याचा आरोप करतात. वर्तमानपत्रातील बातम्यानुसार सप्टेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, चीन इतर राष्टै, व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही लस येणार असल्याचे जाहीर केले आहे. ही लस आली आणि कोरोना नाश झाला तर देवेंद्र फडणवीस काय म्हणतील? याबद्दल आजही माझ्या मनामध्ये विचार येतात आणि मला फडणवीसाबद्दल हसू येते. त्यामुळे मी त्यांना सुचवलेली वरील तीन पुस्तके त्यांनी जरूर वाचावीत, असा माझा पुन्हा एकदा त्यांना सल्ला आहे. ज्यामुळे ते वैफल्यग्रस्त मनस्थितीतून बाहेर येऊन, त्यांचे मनस्वास्थ्य ठीक राहील.
Leave a Reply