
कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील सेंट झेवियर्स हायस्कूलच्या 2002 सालच्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आज दहा सुसज्ज बेड्स जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सुपूर्त केले. त्यातील काही बेड्स हे डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे देण्यात आले. बेडस बरोबर दहा मॅट्रेस, बेडशीट व पिलो व पिलो कव्हर असा संच देण्यात आला.
कोरोना या महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातलेला आहे. देशाबरोबरच महाराष्ट्रातही आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. रुग्ण जास्त पण बेड उपलब्ध नसल्याने तसेच लॉकडाऊन या दुहेरी संकटामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण समाजातील प्रत्येक घटकाने आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना जपली तर प्रशासनातही हातभार लावता येतो हीच गोष्ट लक्षात घेऊन सेंट झेविअर्स’च्या 2002 च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी हे सुसज्ज बेड्स जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे व डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले हॉस्पिटलला सुपूर्त केले.
या माजी विद्यार्थ्यांचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून सर्वांनी जर असा मदतीचा हात पुढे केला तर आपण लवकरच कोरोनावर मात करू शकू असे, कौतुकाचे उद्गार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यावेळी काढले.तसेच आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनी हॉस्पिटलची पाहणी केली. आणि या विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन सर्वांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन केले.यावेळी प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ डॉ. इंद्रनील जाधव यांच्यासह चेतन मिरजकर, शैलेंद्र मोहिते, स्वप्नील अष्टेकर, दिग्विजय पाटील, स्वरूप जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
Leave a Reply