
कोल्हापूर : शिवसेना नेते, युवा सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार मा.आदित्यजी ठाकरे साहेबांचा येत्या १३ जून रोजी वाढदिवस साजरा होत आहे. महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट असल्याने वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन राज्याचे पर्यावरणमंत्री व शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख नामदार आदित्य ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनानुसार शिवसेना आणि युवासेना कोल्हापूर शहरच्यावतीने या वाढदिवसाचे औचित्य साधून “जन्मदिनी वृक्ष लावू प्रत्त्येकानी” अशा वृक्षारोपणाच्या संकल्पाने पर्यावरण पूरक शुभेच्छा दिल्या. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार सर्व शिवसैनिक काम करत असून, सत्ता असो वा नसो समाजकार्याशी आपली नाळ जुळली आहे. लवकरच प्रस्तावित असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानाचा “स्मृतीवन ” म्हणून विकास करणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली.
पर्यावरण मंत्री नामदार आदित्य ठाकरे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज प्रस्तावित असलेले “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान, राजहंस प्रिंटींग प्रेस मागे, नागाळा पार्क, कोल्हापूर” येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शिवसेना आणि युवासेनेतर्फे कदंब, काटेसावर, बहावा, औदुंबर, ब्रम्हदंड, एक्जोरा, भद्राक्ष, मुचकंद, नागकेशर, सिताअशोक, केशर कलम आंबा, करंज, वड, कडलिंबू, बेल या वनऔषधी रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
Leave a Reply