
कोल्हापूर/प्रतिनिधी:भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतात शास्त्रीय वाद्यवृंद याला फार महत्त्व असते. कोणतेही वाद्य सुरात वाजले की त्याला अर्थ असतो. पण तेच वाद्य बेसूर वाजू लागले की त्यातील नाद आणि सूर हरपते.त्याला पुन्हा तालासुरात आणण्याचे काम करतात फिरोज सतार मेकर…
कोल्हापुरातील पापाची तिकटी येथील फिरोज सतार मेकर हे एखादे वाद्य मग ते कोणतेही असो.. त्याची दुरुस्ती व विक्री हाच व्यवसाय गेली अनेक पिढ्या करत आलेले आहेत. पापाची तिकटी येथे जिद्द नावाचे त्यांचे वाद्य दुरुस्तीचे दुकान आहे. तिथे हे फिरोज सतार मेकर सतार, तंबोरा गिटार, हार्मोनियम, तबला यासह कोणतेही वाद्य अगदी सहजपणे दुरुस्त करून देतात.
एखादा वादक कलाकार त्याच्या आयुष्यात फक्त एक किंवा दोन वाद्य वाजवण्यात पारंगत होऊ शकतो. पण फिरोज सतार मेकर हे सर्व वाद्य वाजवण्यात पारंगत आहेत. त्या शिवाय ते बिघडलेले बेसूर वाद्य सुरात आहे की नाही हे कसे कळणार?
त्यात सतार दुरुस्तीमध्ये ते अधिक पारंगत आहेत. त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत यांना ‘सतार मेकर’ असे संबोधले जाते. मूळचे मिरजेचे असणारे फिरोज शिकलगार कोल्हापूर गेल्या 40 वर्षांपासून अधिक वर्षे वास्तव्यास आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे नेहमी याठिकाणी यायचे, सतार ऐकायचे. अजूनही मराठी चित्रपटातील अनेक कलाकार संगीतकार तिथे भेट दिल्याशिवाय जात नाहीत. त्यात प्रामुख्याने सुबोध भावे यांचे नाव घ्यावे लागेल. दिलरूबा, सारंगी यासारखी फार परिचित नसलेली वाद्य दुर्मिळ होत आहेत. त्यांच्या संग्रहही या फिरोज सतार मेकर यांच्याकडे आहे. अनेक पिढ्या या व्यवसायात घालूनही तेवढ्या दिग्गज लोकांनी येथे भेटी दिल्या. पण कधीही प्रकाशझोतात यावे असेही त्यांना वाटले नाही. पण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी भेट दिलेल्या ठिकाणी आपल्या कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आज भेट दिली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाश्चिमात्य संस्कृतीत भारतीय शास्त्रीय कला लोप पावत चालली आहे. त्यामुळे पूर्वीसारखे वाद्यांची विक्री वा दुरुस्ती होत नाही. ही त्यांची खंतही ऐकून घेतली. एकूणच अविरतपणे एक प्रकारची संगीताची सेवा करणाऱ्या या फिरोज सतार मेकर व त्यांच्या कुटुंबाला आज छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त मानाचा मुजरा!
Leave a Reply