
रत्नागिरी : प्रवास आणि खाद्यपदार्थांची रंजक, माहितीपूर्ण सफर घडवणारे, प्रत्येकाच्या आवडीचे टीव्ही चॅनेल एलएफ अर्थात ‘लिविंग फूड्स‘ वर ३ जुलै २०२० पासून नवा शो सुरु होतोय – ‘मस्त महाराष्ट्र‘. महाराष्ट्र राज्याची संपन्न संस्कृती, येथील लोक, विविध ठिकाणे, विपुल निसर्गसौंदर्य आणि रंजक, साहसी इतिहास यांची मनोरम्य आणि मनोरंजक यात्रा या नवीन शोमध्ये घडवली जाणार आहे. ‘भारताच्या हृदयाकडे नेणारे महाद्वार‘ म्हणून नावाजले जाणारे महाराष्ट्र राज्य संस्कृती, व्यवसाय, उद्योगधंदे, परंपरा, नैतिक मूल्ये आणि विविधता यांनी समृद्ध आहे.मुंबईची मुलगी प्राजक्ता माळीने महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये एकटीने केलेल्या प्रवासाची रंजकता आणि तिने अनुभवलेल्या विविध गोष्टी या शोमधून दर्शकांना देखील अनुभवता येणार आहेत. महाराष्ट्राचे विविध रंगढंग, इथले अनेक स्वाद आणि खास चवी यांना प्राजक्ताच्या दृष्टिकोनातून पाहताना, तिला आलेले अनुभव तिच्यासोबत अनुभवताना आपल्याच राज्याची अतिशय आगळीवेगळी, आजवर आपणही न पाहिलेली बाजू या शोमधून दिसेल. राज्यातील वैविध्यपूर्ण लोकजीवन, संस्कृती आणि परंपरांना बांधील असूनही आधुनिक पद्धतीची जीवनशैली, या सगळ्यांना एकत्र जोडून ठेवणारे महाराष्ट्रीयत्व समजून घेण्यासाठी हा शो आपल्याला राज्यातील विविध शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये घेऊन जाणार आहे. याच्या प्रत्येक भागामध्ये राज्यातील लोक, महाराष्ट्राला प्रसिद्धी मिळवून देणारी ठिकाणे आणि राज्यातील लोकप्रिय खाद्यपदार्थ या तीन पैलूंवर प्रकाश टाकला जाईल.
Leave a Reply