
मुरगूड :मुरगुडमध्ये झालेल्या जाहीर भाषणात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकाच दगडात साधले तीन निशाणे. त्यांनी मुरगुडसह यमगे व शिंदेवाडीच्या स्वच्छ पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी केलेल्या समरजीत घाटगे यांना विनंतीसह कोल्हापूर शहराच्या स्वच्छ पाण्यासाठी गैबी बोगद्याच्या संबंधी स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांची “अनटोल्ड स्टोरी” व इचलकरंजीकरांच्या स्वच्छ पाण्याच्या हक्कासह कागल तालुक्यातील जनतेच्या पाणी हक्काचे संरक्षण याबाबत विवेचन केले.भाषणाच्या सुरुवातीलाच श्री मुश्रीफ म्हणाले, आज गुरुपौर्णिमे दिवशीच माझ्या गुरूच्या गावात हा कार्यक्रम होत आहे हा सुवर्णयोग आहे. माझे गुरु स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी ज्याच्यासाठी अट्टाहास केला, तो सोडायचा नाही एवढीच माझी भूमिका आहे. तसेच गुरु स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक, स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे, सहकारातील गुरु शामराव भिवाजी पाटील, हिंदुराव बळवंत पाटील, बाळासाहेब पाटील -कासारीकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दौलतरावजी निकम, विश्वनाथअण्णा पाटील, कॉम्रेड जीवनराव सावंत व कॉम्रेड वसंतराव सावंत या दिग्गजांना गुरुपौर्णिमेनिमित्त वंदन केले.जरी आम्ही राजकारणातील मंडळी असलो तरी गेल्या सहा- सात महिन्याच्या मंत्रिपदाच्या काळात एकाही अधिकाऱ्याची साधी बदली सुद्धा केलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.या भाषणातच मंत्री श्री मुश्रीफ यांनी मुरगुड तलावाच्या पाण्यासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत समरजीत घाटगेनाही विनंती केली. ते म्हणाले, हा तलाव जर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मुरगूड, यमगे आणि शिंदेवाडीच्या लोकांसाठी बांधलेला असेल. त्यातून पिण्याच्या पाण्याचा पहिला सार्वजनिक नळ मुरगूडात आणून सोडला असेल. तर राजर्षी शाहू महाराजांची कल्पना स्वच्छ होती की या तलावाच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी व्हावा. तलावातील पाण्यावरील जनतेच्या हक्कासाठीची स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांची विधानसभेतील भाषणे आणि महसूल मंत्र्यांनी दिलेली उत्तरे मला आजही जशीच्या तशी आठवतात. समरजित घाटगे यांनी तलावातील स्वच्छ पाणी पिढ्यानपिढ्या मुरगुडसह यमगे आणि शिंदेवाडी ग्रामस्थांसाठी द्यावं. उरला प्रश्न त्यांच्या शेतीच्या पाण्याचा. त्यासाठी वेदगंगा नदीवरून शासन तुम्हाला शेतीच्या पाण्यासाठी योजना मोफत करून देईल. अगदी जॅकवेल बांधून आणि ठिबक सिंचन सुद्धा करून देऊ.स्वर्गीय खासदार सदाशिवरावजी मंडलिकसाहेब आमदार असताना दिग्विजय खानविलकर पालकमंत्री होते. त्यावेळी कालवे लवकर होणार नाहीत म्हणून काळमवाडीचे पंचगंगेत सोडावयाचे नऊ टीएमसी पाणी बोगद्याद्वारे त्यांनी मागणी केली होती. या गोष्टीला आम्हा सगळ्याच कागलकरांचा त्याला विरोध होता. त्यावेळी मंडलिकसाहेबांच्या आमदारकीच्या शेवटच्या काळामध्येही सबंध कोल्हापूर शहर प्रदूषित पाणी पीत होते. त्यांना जयंती नाल्यावर नेऊन पंचगंगेत मिसळणारे घाण पाणी दाखविले. नंतर निवडणुका झाल्या व मंडलिकसाहेब पाटबंधारेमंत्री झाले. नंतर श्री. खानविलकर यांनी हा प्रश्न पुन्हा लावून धरल्यामुळे शरद पवार साहेबांच्याकडे बैठक झाली. हा प्रश्न सोडवायची भूमिका पवारसाहेबांनी घेतली. त्यावेळी कोल्हापूर शहराच्या स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी गैबी बोगद्याला परवानगी देऊ, असे म्हणत मंडलिकसाहेबांनी दोन मागण्या केल्या. काळमवाडीच्या आराखड्यात नसलेले वेदगंगेचे पाणी टाका नाल्यातून वेदगंगा सोडायचं आणि कुरजवळ कालवा खोदायचा. तसेच गैबी बोगद्यातून पाच टीएमसीपेक्षा जास्त पाणी द्यायचं नाही. त्यावेळी गैबी बोगदा होणार अशा बातम्या वर्तमानपत्रातून आल्या, मंडलिकसाहेबांच्यावर जोरदार टीकाही झाल्या. सर्वात जास्त जोरदार टीका साहेबांच्या जिव्हारी लागली ती कॉम्रेड जीवनराव सावंत यांची. ते म्हणाले होते, कुर्हाडीचा दांडा गोतास काळ. त्याच दिवशी आम्ही कोल्हापुरात कॉम्रेड जीवनराव सावंत यांना भेटण्यासाठी गेलो. त्यावेळी मंडलिक साहेबांनी जे ठरलेलं होतं ते सर्व सांगितलं. कोल्हापुरकरांना प्रदूषित पाणी प्यावे लागते आणि त्यामुळं ही परवानगी देत आहे, असा खुलासाही श्री. मंडलिक यांनी केला. त्यावेळी कॉम्रेड जीवनराव सावंत आणि कॉम्रेड वसंतराव सावंत या बंधूंनी पाटाने पाणी मिळाले पाहिजे, गैबी बोगद्याला गेट लावलं पाहिजे, डाव्या-उजव्या कालव्यांसाठी निधी द्या या सूचना केल्या.आज इचलकरंजीकरानी वृत्तपत्रांमधून एक निवेदन दिले आहे. त्यात दोन गोष्टींचा उल्लेख आहे. एक म्हणजे आम्हाला स्वच्छ पाणी पिण्याचा अधिकार आहे की नाही. आमच्या पिढ्यानपिढ्या हे विषारी पाणी पीत आल्या आहेत . आमच्या पुढच्या पिढ्यांना तरी स्वच्छ पाणी मिळणार की नाही ? आम्ही काय चीन, अमेरिका, पाकिस्तानातून आलो आहोत काय ? हे वाचून मीही अस्वस्थ झालो.दरम्यान; अजूनतरी मला इचलकरंजीकर भेटलेले नाहीत. ते भेटल्यानंतर त्यांची भूमिका समजून घेणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी कागल तालुक्याच्या एकाही थेंबावर जर अन्याय होणार नसेल, ते पाणी अडवल्यामुळे जर आमच्या जमिनी बुडणार नसतील आणि आमच्या हद्दीच्या बाहेर ते जर बंधारा करणार असतील तर मी, खासदार संजय मंडलिक , माजी आमदार संजय घाटगे, दूधगंगा कृती समितीचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील आम्ही समजावून घेऊ आणि निश्चितपणे त्यातून चांगला मार्ग काढू.
Leave a Reply