
कोल्हापूर : वैयक्तिक दु:खांचा विचार न करता, आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या सहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे मातंग समाजाचे कैवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरातील राजारामपुरी येथील स्मारकास कायमस्वरूपी विद्युत रोषणाईचे काम पूर्ण करण्यात आले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून या स्मारकाच्या सुशोभिकरणास रु.अडीच लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या सुशोभीकरणानंतर हे स्मारक आणि परिसर विद्युत रोषणाईने उजळून गेला आहे.यासंदर्भात माहिती देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे साहित्य क्षेत्रातील एक विद्यापीठ आहेत. विद्यापीठ जस सर्व शाखांच असत तसच वाड्मयातल्या सर्वच प्रकारात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनी आपल नांव कोरून ठेवल आहे. दलित आणि मातंग समाजासह सर्वच जाती धर्माच्या लोकांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या साहित्य वाचनातून अनेक लेखकांना लेखनाची योग्य दिशा मिळाल्याचे आज अनेक मान्यवर लेखक मान्य करतात. एकाच व्यक्तीची विविधांगी कामगिरी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश- विदेशातही शोधून सापडणारी नाही. अशा थोर वाड्मयकर्त्या आदर्श कलावंताना जन्मशताब्दी निमित्त विनम्र आदरांजली वाहिली.
Leave a Reply