
मुरगुड:मुरगूड शहरासह या विभागालाही कोरोना संसर्गाच्या महामारीपासून सुरक्षित ठेऊ, अशी हमी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सध्या उद्भवलेल्या महापुर परिस्थितीचीही या शहरासह विभागातील नागरिकांना तोशीस लागू देणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच या बैठकीत श्री. मुश्रीफ यांनी मुरगूडच्या विकास कामांसाठी 50 लाख रुपयांचा निधी व ॲम्बुलन्स किंवा शववाहिका तातडीने देत असल्याचे जाहीर केले.कोरोना आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर मुरगूड ता. कागल येथील भुते हॉलमध्ये आयोजित आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, कोरोना बाधितांच्या सुविधेसाठी शिवराज महाविद्यालयात दहा ऑक्सिजन बेड तातडीने घातले आहेत. रुग्णांच्या मदतीसाठी एक अत्यावश्यक ऍम्ब्युलन्स येथे असेल. महापुराचा धोका ओळखून अत्याधूनिक बोटीसह एनडीआरएफ तुकडी तैनात केली आहे. गरज पडली तर तातडीने दुसरी टीमही मुरगूडला पाठवू. या दोन्हीही आपत्ती निवारणासाठी या विभागाला निधी, साहित्यसामुग्री आणि मनुष्यबळही कमी पडू देणार नाही.कागल तालुक्यात एकूण 241 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी 114 पूर्ण बरे झाले आहेत, तर कागल येथील कोविड केअर सेंटर येथे 37, सीपीआर मध्ये 10, खाजगी दवाखान्यात 45 व घरी उपचार घेणारे 27 असे 119 रुग्ण अँक्टिव्ह आहेत. तसेच कागल येथील तीन मुरगूड येथील चार व दौलतवाडी येथील एक असे आठ कोरोना बाधित मयत झाले आहेत. मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या या संकटात शासन आपल्या पाठीशी ठाम असून आवश्यक उपयोजना त्वरित करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा करत आहोत. यासाठी कागल तालुक्यात जवळपास चारशेहून अधिक ऑक्सिजन बेड निर्माण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. कागल येथील कोगनोळी जवळचा हॉल व मुरगूड येथील शिवराज महाविद्यालय व इतर खासगी दवाखान्यांमध्ये ही कोवीड बाधित रुग्णांवर उपचार होणार असून यासाठी आवश्यक वैद्यकीय कर्मचारी नेमले आहेत. खासदार संजय दादा मंडलिक म्हणाले, कागल व मुरगुड शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातील बाधित रुग्णांची संख्या अतिशय अत्यल्प आहे. यावरून या लोकांनी अधिक खबरदारी घेतल्याचे दिसत आहे. गेले चार ते पाच महिने अविरत काम करणाऱ्या सर्वच प्रशासकीय यंत्रणांवर ही आता मर्यादा येत असल्याने प्रत्येक नागरिकाने आता कोविड योद्धा झालं पाहिजे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर जागे होण्यापेक्षा आम्ही दूरगामी विचार करत अधिक चांगले नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहोत.या बैठकीला प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रेयस जुवेकर, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव, कृषी अधिकारी श्री. माळी, बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. शिंदे, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड मुरगूड सर्कल सौ. एस एस भाट, तलाठी विजय गुरव यांच्यासह मुरगूडचे नगरसेवक उपस्थित होते. नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी आभार मानले.
Leave a Reply