
कोल्हापूर:लॉकडाउन काळातील 200 युनिट वीजबिल माफ करण्यात यावे व एप्रिल पासून लागू केलेली विजदरवाढ मागे घेण्यात यावी या मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने पालकमंत्री मा. ना. सतेज पाटील यांच्या ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. ‘कोल्हापूरकरांचं पालकमंत्र्यांना आवाहन, आपण वाढीव वीजबिल भरू नका’, ‘लॉकडाउन काळातील 200 युनिट वीजबिल माफ झालेच पाहिजे’ या आशयाचे फलक आंदोलनात झळकत होते.’वीज बिल माफ करा, अन्यथा खुर्ची खाली करा’, ‘वीज दरवाढ मागे घेतलीच पाहिजे’, ‘अवाजवी दरवाढ करणाऱ्या वीज कंपन्यांचा धिक्कार असो’, ‘नागरिकांची आर्थिक कुचंबणा करणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो’ या घोषणांनी ताराबाई पार्क परिसर दुमदुमला होता.लॉकडाउनमुळे सर्वसामन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यातच महावितरण वीज कंपनीने विजेचे दर वाढवल्यामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. ‘आप’च्या वतीने वेळोवेळी निवेदन सादर करून, विजबिलांची होळी करून तसेच एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून विजबिलांमधील दरवाढ मागे घेण्याचे आवाहन केले होते.तसेच आम आदमी पार्टीच्या वतीने लॉकडाउन काळातील प्रतिमहिना 200 युनिट वीजबिल माफ व्हावे या मागणीला पाठिंबा म्हणून नागरिकांसाठी मिस्ड कॉल मोहीम सुरू करण्यात आली होती, त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 8500 ग्राहकांनी मिस्ड कॉल देऊन विरोध दर्शविला.परंतु या सगळ्या आंदोलनांची कोणतीच दखल अद्याप राज्य शासनाने घेतली गेलेली नाही. नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे हे समोर दिसत असताना देखील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून कोणताही दिलासा दिला जात नाही आहे. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री या नात्याने जर मा. ऊर्जामंत्री यांना त्यांनी सद्यपरिस्थिती अवगत करून दिल्यास यावर उपाय निघू शकेल.”जोपर्यंत दरवाढ मागे घेतली जात नाही व वरील मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नागरिकांनी बिले भरू नयेत असे आवाहन आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे. या असहकार आंदोलनात आपण देखील सामील होऊन स्वतःचे कार्यालयाचे, घराचे व इतर संस्थांचे बिल न भरून नागरिकांच्या भावना राज्य सरकार पर्यंत पोहचवाव्यत”, असे मत आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी यावेळी व्यक्त केले.
या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून खालील मागण्या करण्यात आल्या:
1. लॉकडाउन काळातील प्रति महिना 200 युनिट वीजबिल माफ झालेच पाहिजे.
2. विजबिलांची स्लॅब दरवाढ रद्द झालीच पाहिजे.
3. वीजबिलातील वाढीव वहन आकार रद्द झालाच पाहिजे.
4. लॉकडाउन काळातील वीजबिल ज्या ग्राहकांनी भरले आहे त्यांच्या बिलांच्या रक्कमेतील फरक पुढील बिलातून वजा केला पाहिजे.
या मागण्यांची पूर्तता पुढील एका आठवड्यात करून राज्य शासनाने सामान्य नागरिकांना व वीज ग्राहकांना दिलासा देऊन त्यांची आर्थिक कुचंबणा थांबवावी. अन्यथा, आम आदमी पार्टीला हे आंदोलन नाईलाजासत्व तीव्र करावे लागेल याची नोंद घ्यावी असे यावेळी सांगण्यात आले.यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, सुदर्शन कदम, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, संपदा मुळेकर, राज कोरगावकर, मोईन मोकाशी, आदम शेख, इलाही शेख, प्रमोद परीट, प्रकाश सुतार, शरद पाटील, कृष्णात काणेकर, जयवंत पोवार, नीता पडळकर, प्रथमेश सूर्यवंशी, बसवराज हदीमनी, सुभाष यादव, लखन काझी, दीपक नंदवानी, बाळासो जाधव, सचिन डाफळे, विशाल वठारे, धैर्यशील शिंदे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply