
कोल्हापूर: अभियांत्रिकी पदविकेला उज्ज्वल भविष्य असून प्रवेशासाठी अजूनही संधी असल्याची माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी आज दिली. शासकीय तंत्रनिकेतन येथे जिल्ह्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत. त्यासंबंधी अधिक माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आयआयएफचे विभागीय अध्यक्ष सुमित चौगुले म्हणाले, आजच्या घडीला उद्योगधंद्यांची स्थिती चांगली होत आहे. त्यानुसार उद्योगात रोजगाराची संख्याही वाढेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमधून मोठ्या प्रमाणात देशात उद्योग येत आहेत. त्यामुळे येथील उद्योगांना मोठ्या प्रमाणात तांत्रिक मनुष्यबळाची गरज पडणार आहे. एकंदरीतच वाहन उद्योगाचे भविष्यही उज्ज्वल आहे. आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी व कुशल तंत्रज्ञ होण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाची जरुरी आहे.
गारगोटी येथील आयसीआरईचे प्रा. डी. के. शानेदिवाण म्हणाले, अभियांत्रिकी प्रवेशाची सुलभ प्रक्रिया आहे. आज सर्व क्षेत्रातील विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन त्यांनी स्वतःचा विकास केला आहे.
बापूजी साळुंखे इंजिनियरिंग ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. बी. ए. पाटील म्हणाले, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी कमीत कमी वयात रोजगारक्षम बनून त्याच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता येण्यास मदत होते.
शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रशासकीय अधिकारी ए. एम. म्हैशाळे म्हणाल्या, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला फी माफ, स्कॉलरशिप, आर्थिक साह्य अशा विविध माध्यमातून सहकार्य केले जाते. त्यामुळे पालकांवर आर्थिक भार पडत नाही.
दरम्यान, अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळू शकेल. यामध्ये एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना कोणतेही शैक्षणिक शुल्क नाही, तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शाहू शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. वसतिगृहाची सुविधा आहे. शासकीय तंत्रनिकेतन येथे स्थापत्य, यंत्र, विद्युत अभियांत्रिकी, औद्योगिक अणुविद्युत, माहिती तंत्रज्ञान आणि धातू अभियांत्रिकी असे सात प्रकारचे अभ्यासक्रम राबविले जातात. ऑनलाईन प्रवेशासाठी poly20.dtemaharashtra.org या वेबसाईटवर लॉग इन करून प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी ४ सप्टेंबर अंतिम तारीख आहे. यावेळी प्राध्यापक शशांक मांडरे यांनी पत्रकार परिषद घेण्याचा हेतू स्पष्ट केला.
Leave a Reply