
विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच गणिताविषयी आवड निर्माण करण्याची गरज असून पुस्तकी अभ्यासाशिवाय कथा किंवा इतर माध्यमातून देखील प्रयत्न केले पाहिजे.यामुळेच त्यांच्यामध्ये गणिताबाबत असलेेली भीती दूर करून एक सकारात्मक दृष्टीकोन विकसित होऊ शकतो,असे मत विविध तज्ञांनी व्यक्त केले. मॅप ई.पी.आय.सी कम्युनिकेशन्स प्रा.लि.ने नुकतेच या विषयावर तीन दिवसीय वेबिनारचे सत्र आयोजित केले होते.एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुध्दे, बालभारतीच्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या सदस्य प्राजक्ती गोखले,अनुभूती नॉलेज अॅन्ड रिसर्च फाऊंडेशनचे संचालक प्रसाद मणेरीकर व शैक्षणिक सल्लागार प्राची साठे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यामध्ये अॅस्थेटिक्स इन मॅथेमॅटिक्स,पर्सेप्शन डेव्हलपमेंट इन मॅथेमॅटिक्स आणि बिझनेस अॅन्ड मॅथेमॅटिक्स अशा विविध विषयांवर संवाद साधण्यात आला.याप्रसंगी मॅप ई.पी.आय.सी कम्युनिकेशन्स प्रा.लि.तर्फे अंकनाद या वैशिष्ट्यपूर्ण अॅपचे उद्घाटन करण्यात आले.अंकनाद मध्ये पाढे आणि कोष्टके यांना सुश्राव्य संगीताची जोड दिल्याने पाठांतर हे नुसती घोकंपट्टी न राहता त्याबरोबर आकलन शक्ती वाढण्यास मदत होते. पावकी,निमकी, पाऊणकी अशी आजच्या काळात वापरली न जाणारी कोष्टके याद्वारे सहजपणेआत्मसात केली जातात व यामुळे लहानमोठ्या आकडेमोडी व इतर गणिते सोडविणे सोपे जाऊ लागते. गणिताच्या विविध पैलूंविषयी विचार व संकल्पनांचे आदानप्रदान व्हावे यासाठी निर्मित केलेल्या गणितालय या अंकनाद क्लबचे देखील उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी बोलताना अनिल सहस्त्रबुद्दे म्हणाले की,गणिताचा संबंध हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या विज्ञान आणि आभियांत्रिकीसह सर्वच विषयांशी असतो. गणितामुळे तार्किक व अमूर्त विचार विकसित होण्यात मदत होते.शालेय शिक्षणात गणित हे विद्यार्थ्यांसाठी अधिक रंजक झाले पाहिजे.गणिताचा उपयोग दैनंदिन जीवनात कसा होतो हे त्यांच्या पर्यंत पोहचले पाहिजे.आपल्या पाल्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्याकरिता पालक देखील महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.वेळेचे व्यवस्थापन, घरगुती व छोट्या वस्तूंचे मोजमाप,तसेच कथा किंवा क्रीडाद्वारे देखील गणिताच्या विविध पैलूंबाबत समज विकसित होऊ शकतो.गणितात स्मरणशक्ती ही महत्वाची असते आणि आपल्या जीवनात गणिताचा उपयोग देखील तितकाच महत्त्वाचा असतो.म्हणून या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधून गणिताची आवड निर्माण करणे गरजेचे आहे.हे अॅप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असून या अॅपमधील प्रत्येक फाईल डाऊनलोड करण्यासाठी शुल्क आहे. हे एनकोडेड एमपी 3प्लेयर्सवर देखील उपलब्ध आहे.
Leave a Reply