
कोल्हापूर: लॉकडाउनमुळे सर्वसामन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यातच महावितरण वीज कंपनीने विजेचे दर वाढवल्यामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.आम आदमी पार्टी सातत्याने यावर आवाज उठवत आलेली आहे. ‘आप’च्या वतीने वेळोवेळी निवेदन सादर करून, विजबिलांची होळी करून, एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून तसेच पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून विजबिलांमधील दरवाढ मागे घेण्याचे आवाहन केले होते.परंतु या सगळ्या आंदोलनांची कोणतीच दखल अद्याप राज्य शासनाने घेतलेली नाही.वीजबिल आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवत आम आदमी पार्टीने ताराबाई पार्क येथील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले.वीजवितरण कार्यालयाला टाळे लावण्यासाठी जाताना आम आदमी पार्टीचे संदिप देसाई आणि इतर पदाधिकारी यांची पोलिसांबरोबर झटापट झाली. पोलिसांनी बळाच्या जोर वापरत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना टाळे ठोकण्यापासून रोखले.कार्यकर्त्यांनी हातात धरलेले कुलूप आणि साखळी यावेळी चर्चेचा विषय ठरली.यावेळी कार्यकर्त्यांनी ‘लोकडाउन मधील 200 युनिट वीज बिल माफ झालेच पाहिजे’, ‘वीज दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘ वीज दरवाढीवर निर्णय न घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा दिल्या.वाढीव विजबिलांसंदर्भात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत: लॉकडाउन काळातील प्रति महिना 200 युनिट वीजबिल माफ झालेच पाहिजे. विजबिलांची स्लॅब दरवाढ रद्द झालीच पाहिजे. वीजबिलातील वाढीव वहन आकार रद्द झालाच पाहिजे. लॉकडाउन काळातील वीजबिल ज्या ग्राहकांनी भरले आहे त्यांच्या बिलांच्या रक्कमेतील फरक पुढील बिलातून वजा केला पाहिजे. शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे ३०० युनिट पर्यंत ३०% स्वस्त वीज देण्याचे आश्वासन पूर्ण करावे. वीज वितरण कंपन्यांचे सी. ए. जी. ऑडिट करावे.यावेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील,संतोष घाटगे, सूरज सुर्वे, धैर्यशील शिंदे, रविराज पाटील, राज कोरगावकर, प्रथमेश सुर्यवंशी, महेश घोलपे, संपदा मुळेकर, लखन काझी, करणसिंह जाधव, यांनी सहभाग नोंदवल.
Leave a Reply