
कोल्हापूर: गेल्या तीन-चार वर्षांमध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये नोकर्या मिळत नाहीत, अशा प्रकारचे वातावरण तयार झाल्यामुळे या क्षेत्राबाबत गोंधळाची स्थिती उडाली. त्यामुळे वाणिज्य, कला व शास्त्र शाखेची पदवी घेऊन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, अशा प्रकारचा मतप्रवाह असल्याने अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश कमी झाले. अगदी शासकीय तंत्रनिकेतनांमध्येही अशी स्थिती आहे.
कोणत्या तरी विचारप्रवाहाच्या आहारी जाऊन सगळ्यांनी त्याच मागे पळायचे आणि नंतर नोकरीची पुरेशी संधी उपलब्ध होत नाही असे चित्र निर्माण होते, याचा सर्वांनी विवेकाने विचार करावा. खरोखर परिस्थिती काय आहे? काल जी परिस्थिती होती ती आज नसते. आज परिस्थिती बदलत आहे. जागतिक घडमोडींमुळे चीनमधील कित्येक उद्योगधंदे तेथून बाहेर पडत आहेत. हे उद्योगधंदे भारतासारख्या देशामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात एक पूरक वातावरण भारतीय उद्योगधंद्यांमध्ये निर्माण झाले आहे.
परिणामी कोल्हापूरसारख्या स्थानिक धातू उद्योगांकडे निर्यात आधारित मागणीसंदर्भात चौकशी होत आहे. गेल्या तीन-चार वर्षांत मंदीच्या छायेत असलेल्या धातू उद्योगाला खूप चांगले दिवस येणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये अभियांत्रिकी क्षेत्रात आपण नसल्याबद्दल निश्चितच खंत वाटेल. त्यासाठी जाणीवपूर्वक आपले करिअर निवडले पाहिजे. याकरिता उद्योग क्षेत्रातील जाणकारांकडून माहिती घेणे व चर्चा करणे हे जरूरी आहे. सध्या बाजारात करिअरविषयी काय स्थिती आहे, याची तुम्हाला निश्चित माहिती मिळेल.
शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर येथे २००७-०८ या वर्षापासून धातू अभियांत्रिकीचा (मेटलर्जी) पदविका अभ्यासक्रम सुरू झाला. प्रत्यक्ष कोल्हापुरातील स्थानिक उद्योगधंदे पाहिले तर त्यामध्ये धातू संबंधित फौंड्री, मशीनशॉप हे उद्योग प्रामुख्याने आहेत. शहर आणि आसपासच्या औद्योगिक वसाहतींमध्येदेखील हेच चित्र पाहावयास मिळते. येथील स्थानिक उद्योजकांनी कुशल मनुष्यबळ मिळण्याकरिता केलेल्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाले आहे.
२०१० सालामध्ये या पदविकेची पहिली बॅच बाहेर पडली. तेव्हापासून ते आजतागायत (२०१९-२०) दहा बॅचेस बाहेर पडल्या. या पदविकेचे वैशिष्ट्य असे की, कोल्हापूरनंतर पुणे आणि नागपूर येथील शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम सुरू आहे. त्यामुळे येथून बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांना बाजारात प्रचंड मागणी असते. धातू अभियंत्यांना ऑॅटोमोबाईल क्षेत्रातील प्रमुख उद्योग समूह म्हणजे महिंद्रा, टाटा मोटर्स, किर्लोस्कर, बजाज, भारत फोर्ज इत्यादी ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. याखेरीज मोठे स्टील उद्योग, रेल्वे, लष्करसंबंधित उद्योगांमध्येही मोठी मागणी असते.
कोल्हापुरातून धातूशास्त्र पदविका घेऊन बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावरच नोकरीची हमी आहे. त्यामुळे आजपर्यंत या क्षेत्रातील एकही विद्यार्थी नोकरीविना असणारा मिळणार नाही. कॉम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक्ससारख्या अभ्यासक्रमांना स्थानिक स्तरावर नोकरीच्या संधी कमी आहेत. पर्यायी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना बाहेरगावामध्ये नोकरीसाठी जावे लागते. मात्र धातू अभियांत्रिकी हा अभ्यासक्रम असा आहे की, स्थानिक पातळीवरच या मनुष्यबळाची गरज आहे. याखेरीज पुणे, मुंबई येथील उद्योगांमध्येही नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या अनेक संधी धातू अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्राप्त होऊ शकत असल्याने त्याचा स्थानिकांनी विचार करणे गरजेचे आहे.
धातू अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची काही ठळक वैशिष्टये –
१) हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भविष्यामध्ये आयुष्यात कोठेही स्पर्धेला तोंड द्यावे लागत नाही. मागणी अधिक असल्याने नोकरीची हमखास संधी
उपलब्ध होते.
२) मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे स्पेशलायझेशन म्हणून धातू अभियांत्रिकीला समजले जाते.
३) धातूच्या संबंधित ज्या काही प्रक्रिया असतात किंवा वेगवेगळ्या वस्तू तयार करायच्या असतील त्याला मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी असे म्हणतात. या संबंधित सर्व तांत्रिक व शास्त्रशुद्ध शिक्षण धातू अभियांत्रिकीमध्ये दिले जाते.
४) धातूंच्या गुणधर्मासंबंधी सखोल अभ्यास झाल्यामुळे यासंबंधी वेल्डिंग, फौंड्री, फोर्जिंग किंवा धातूंचे दागिने व इतर वस्तू तयार करणे इत्यादी अनेक प्रकारचे व्यवसाय सुरू करता येतात.
ज्यांना मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचे असते, ते विद्यार्थी पहिली पदविका घेतात व नंतर त्याच विषयात पदवी करायला जातात. म्हणजे थोडक्यात जे विषय त्यांनी डिप्लोमा किंवा पदविकेला असतात, तेच विषय पदवी अभ्यासक्रमाला जाऊन शिकतात. म्हणजे पुन्हा पुन्हा तेच विषय शिकतात. मॅकेनिकल इंजिनिअर पाहिजे म्हणून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून जाऊन ते बाहेर खासगी कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. भरपूर फी देतात. पण एक दुसरा पर्याय तुम्ही लक्षात घेतला पाहिज की, तुम्ही डिप्लोमा इन मेटलर्जी किंवा धातू अभियांत्रिकी पदविका पूर्ण करूनही पुढे जर मॅकेनिकल इंजिनिअरिंगला जायचे असेल तरीही तुम्ही जाऊ शकता. थोडक्यात डिप्लोमा इन मेटलर्जी आणि डिग्री इन मॅकेनिकल इंजिनिअरिंग असे तुमचे कॉम्बिनेशन असेल तर तुम्हाला आयुष्यभर तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल. तुम्हाला कोठेही नोकरीच्या वेळी प्राधान्य दिले जाईल. कारण तुम्हाला वेगवेगळ्या विषयाचे जास्त ज्ञान असणार आहे. हा पर्याय तुम्ही जरूर विचारात घेतला पाहिजे.
Leave a Reply