
कोल्हापूर : येथील धातू तंत्र प्रबोधिनीच्या असोसिएशनच्या वतीने प्रकाशित करण्यात येणारी मराठी धातू तंत्र पत्रिका येत्या हिंदी (ता. १४) दिनापासून हिंदीमध्ये प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती संपादक शशांक मांडरे यांनी दिली.ते म्हणाले, येथील धातू तंत्र प्रबोधिनीच्या असोसिएशनच्या वतीने धातू उद्योगातील घटकांसाठी प्रांतीय भाषेमध्ये धातू अभियांत्रिकीचे ज्ञान उपलब्ध करण्याच्या हेतूने व मराठीत पहिलाच प्रयोग असणाऱ्या धातू तंत्र पत्रिका या मराठी मासिकाची सुरवात करण्यात आली. आतापर्यंत मराठीमध्ये सहा अंक प्रकाशित करण्यात आले. त्याला या क्षेत्रातील वाचकांकडून मोठ्या प्रमाणात मिळालेल्या यशस्वितेनंतर हिंदी क्षेत्रातील वाचकांकडून आलेल्या मागणीनुसार हिंदीमध्येही आता प्रकाशन करीत आहोत.
त्यांनी सांगितले की, येत्या हिंदी दिनाला ऑनलाईन होणाऱ्या या कार्यक्रमाला नवी दिल्लीतील इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनचे प्रेसिंडेट प्रतापसिंह काकासाहेब देसाई यांच्या हस्ते धातू तंत्र पत्रिकेच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन होईल. यावेळी दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौंड्रीमेनचे पश्चिम विभागीय अध्यक्ष मनीष पत्रीकर यांच्यासह या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अंकामध्ये घडामोडी, व्यवस्थापन, तांत्रिक माहिती, नावीन्यपूर्ण उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण व तपासणी आणि रंजक अशा सदरांमध्ये या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करीत असताना आलेल्या अनुभवावर नामवंत अशा जाणकारांकडून विविध लेख प्रकाशित केले आहेत.
दरम्यान, यावेळी या क्षेत्रातील विविध घटकांना सहयोग करण्याच्या दृष्टीने www.dhatutantrasetu.in आणि अंकाच्या www.dhatutantrapatrika.in या दोन वेबसाईटचे उदघाटन औपचारिकरीत्या करण्यात आले. अधिक माहितीसाठी दोन्ही वेबसाईटला भेट देण्याचे आवाहनही श्री. मांडरे यांनी केले. याचबरोबर येत्या दसरा-दिवाळीमध्ये मराठी-हिंदी अशा दोन भाषांमध्ये विशेषांक प्रकाशित करण्यात येणार आहे. या अंकासाठी धातू उद्योगाशी संबंधित घटना, घडामोडींवर लिखाण पाठवावे, ही विनंती. लेखकांनी- संपादक, धातू तंत्र पत्रिका, पार्वती मल्टिप्लेक्सशेजारी, धातू तंत्र प्रबोधिनी असोसिएशन, शीतल चेंबर्स, पहिला मजला, कोल्हापूर-४१६००८ या लिखाण पत्त्यावर पाठवावे, असेही श्री. मांडरे यांनी यावेळी सांगितले.
कार्यकारी संपादक बाबासाहेब खाडे, श्रीमती नलिनी नेने, देवदत्त आद्री, सुरेश पाटील, सूरज महाजन, प्रिया जाधव व अंकाची निर्मितीमधील प्रमुख घटक असणारे सर्वजण उपस्थित होते.
Leave a Reply