
कागल :खाजगी डॉक्टरांनो, कोरोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नका. माणुसकीचा ओलावाही जिवंत ठेवा, असे भावनिक आवाहान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आगतिक कोरोनाबाधित रुग्णांचा केवळ गैरफायदा न घेता, समाजाची सेवाही करा, असेही ते म्हणाले.कागलमध्ये नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशन व खासगी डॉक्टर डॉ. अमर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमात श्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी नगरसेवक प्रवीण काळबर यांनी सुरु केलेल्या रुग्णवाहिकेचाही शुभारंभ झाला. तसेच कोरोनातून बरे झालेल्या कागल मधील हिंदुराव परसू पसारे (वय-७५) व त्यांच्या पत्नी सौ सुलोचना हिंदुराव पसारे (वय-७०)या जोडप्याच्या हस्ते मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार झाला. यापद्धतीने सुरू केलेले महाराष्ट्रातील हे पहिले आणि एकमेव कोविड हॉस्पिटल आहे. ११२ बेडच्या या हॉस्पिटलमधून अलगीकरणसह ऑक्सिजन व व्हेटीलेटर या सुविधाही अत्यल्प दरात दिल्या जाणार आहेत.ते पुढे म्हणाले, ‘माझं कुटुंब -माझी जबाबदारी’ हे अभियान प्रभावीपणे राबवूया, घराघरात ताप आणि ऑक्सिजनची तपासणी करून जे संभाव्य रुग्ण असतील त्यांची टेस्ट करून त्यांच्यावर तातडीने उपचार करूया. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर हा या योजनेचा पहिला टप्पा असेल. १२ ते २४ ऑक्टोबर हा या योजनेचा दुसरा टप्पा असेल आणि २५ ऑक्टोबरला कोरोनारुपी राक्षसाचा वध करण्याचा निर्धार करुया.विरोधक समरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता श्री मुश्रीफ म्हणाले, त्यांचा कारखाना साखर कारखाना आहे. आवश्यक साधन सामग्रीही तयार आहे. त्यांनीही एखादे कोविड सेंटर सुरू करावे. जनतेच्या सेवेसाठी हातात हात घालून काम करूया. या संदर्भातील त्यांच्याशी चर्चेलाही मी तयार आहे. अशा महाभयानक संकट काळात जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, हे आम्हा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे.माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर म्हणाले, मुश्रीफसाहेब, कोरोनासारख्या महाभयानक महामारीत तुम्ही हजारो लोकांना मृत्यूच्या दाढेतून परत आणलं. कोरोना योद्धे म्हणून लढणाऱ्या प्रशासनालाही फार मोठा आधार, पाठबळ दिलात. कोल्हापूर, अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासह, संबंध राज्यातही तुम्ही लक्ष दिलात. आपला -परका न मानता विरोधकांनासुद्धा तुम्ही वाचवले. हजारो रुग्णांना बेड मिळवून दिलेत. आज विरोधकांची अशी भावना आहे, की गटातटाच्या पक्ष पार्टीच्या बंधनात अडकून आम्ही तुम्हाला मते दिली नाहीत, हे खरे आहे. परंतु परमेश्वराने मात्र तुमच्या विजयाचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. गेली सहा महिने तुम्ही जनतेसाठी रात्रंदिवस राबत आहात. न डगमगता धीरोदात्तपणे गेल्या तीस पस्तीस वर्षांचा वारसा तुम्ही समर्थपणे जोपासला. जनतेसाठी हे सगळं करीत असताना तुम्ही स्वतःची, स्वतःचा संसार आणि कुटुंबाचीही फिकीर केली नाहीत. घरात लहान मुलं आणि एवढा मोठा कुटुंबकबिला असतानाही तुम्ही देवदूत बनून अखंड कार्य करीत आहात.
मंत्री मुश्रीफ यांच्या सुरक्षिततेसाठी श्री काळबर यांनी देवीला नवस बोलून दंडवत घालण्याचा आणि कंदुरी करण्याचीही घोषणा यावेळी केली.या तालुका आढावा बैठकीला प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रेयस जुवेकर, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूड सहाय्यक पोलिस निरीक्षक सौ. विद्या जाधव, जिल्हा बॅंक संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, रमेश माळी, कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडीत पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, आरोग्य निरीक्षक अभिजीत गोरे, प्रवीण काळबर, विवेक लोटे, ॲड. संग्राम गुरव आदी उपस्थित होते. उपनगराध्यक्ष सौरभ पाटील यांनी आभार मानले.
Leave a Reply