
कोल्हापूर : बाळाला जन्म दिल्यानंतर कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या ओल्या बाळंतिणीला व्हाईट आर्मी आणि मेडिकल असोसिएशनच्या कोविड सेंटर मूळे जीवदान मिळाले.16 सप्टेंबर रोजी ही बाळंतीण आपल्या 13 दिवसांच्या नवजात कन्येसह आपल्या आईच्या घरी जातेय.कोरोनाला हरवून घरी परतणाऱ्या या आपल्या मुलीला जीवदान मिळाल्याने घरची मंडळी हरखून गेलीयत.सासरच्या आणि माहेरच्या मंडळीने व्हाईट आर्मीच्या अशोक रोकडे आणि त्यांच्या सर्व मेहनती जवानांचे तसेच मेडिकल असोसिएशनच्या सर्व डॉक्टर आणि विशेष करून तिच्यावर उपचार करणारे डॉ.आबासाहेब शिर्के यांचे मनापासून आभार व्यक्त केलेत.प्रयाग चिखली येथील मुलीला लग्न लावून मुंबईला दिली.संसार सुखाचा सुरू झाला.गरोदरपणात बाळंतपणासाठी तिला माहेरी यायचे होते.ती तीन महिन्यांपूर्वी प्रयाग चिखलीमध्ये माहेरला आली.एका नामांकित प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरकडे तिच्यावर गरोदरपणात उपचार सुरू होते.दिवस भरले आणि तीन सप्टेंबर रोजी तिच्या पोटात दुखू लागले.म्हणून दवाखान्यात नेले.पण स्वैब घेतल्याशिवाय तिला दाखल करून घेण्यासाठी डॉक्टर तयार झाले नाहीत.अशातच तिचा स्वैब दिला.आणि तो पॉझिटिव्ह आला.हे ऐकून ‘त्या’डॉक्टर ने या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून घ्यायला नकार दिला.घरच्या लोकांची तारांबळ उडाली.पण जवळच्याच एका डॉक्टरांनी तिला आपल्या पेशाला शोभेल असे निर्णय घेऊन तिला आपल्या दवाखान्यात दाखल करून घेतले.प्रसव वेदना असह्य झाल्या,पण डॉक्टरांनी सिझेरियन करून बाळाचा आणि मातेचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला.आणि मध्यरात्री 1वाजण्याच्या सुमारास या मातेने एका गोंडस कन्या रत्नाला जन्म दिला…या मातेचे नाव अमृता सचिन गुरव वय वर्षे 28 रा.मुंबई आणि तिचे माहेर प्रयाग चिखली..
असह्य प्रसव पीडा सहन केल्या नंतर आणि बाळाच्या जन्मानंतर मातेचे पुनर्जन्म होते असे म्हणतात.पण ही माता कोरोना ग्रस्त झाली.आणि माहेरच्या लोकांची काळजी वाढली.अमृताला कोरोनाच्या उपचारासाठी आता कोणत्या दवाखान्यात ठेवायचे या चिंतेने ग्रासले..पण अमृताचा मामा बाळकृष्ण गुरव हे एका दवाखान्यात नोकरीला असल्याने त्यांना वैद्यकीय क्षेत्राची जाण होती.त्यांनी तात्काळ अशोक रोकडे यांच्याशी संपर्क साधला.आणि आपल्या भाचीला आलेली अडचण आणि घरच्यांसमोर उभा ठाकलेला प्रसंग कथन केला.व्हाईट आर्मीच्या अशोक रोकडे यांनी क्षणाचाही विलंब न करता या मातेला तात्काळ व्हाईट आर्मीच्या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करायला सांगितले..मध्यरात्री 2 वाजता आपल्या नवजात कन्येसह अमृता गुरव कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल झाली.बाळाची काळजी घ्यायला तिची जुनी जाणकार आजी सुद्धा याच कोविड सेंटरमध्ये राहिली..अमृताला मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.आबाजी शिर्के आणि त्यांचे सहायक डॉ.अमोल कोडोलीकर या दोघांच्या देखरेखीखाली तब्बल बारा दिवस उपचार करण्यात आले.या काळात व्हाईट आर्मीच्या नर्स हिना यादवाड यांनी तर दिवसरात्र एक करून अमृताला काय हवंय काय नको याची काळजी घेतली.तिची मनापासून सुश्रूषा केली.सोबतीला व्हाईट आर्मीचे कोरोना योद्धे जवान होतेच..
आता 13 दिवसांनी अमृताच्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या आहेत आणि त्या पूर्णपणे निगेटिव्ह आल्या आहेत.त्यामुळे अमृता आपल्या नवजात कन्येसह माहेरी चालली आहे..
*बारशाचं निमंत्रण -*
पण हो बाळ आणि बाळंतिणीला असंच जाऊ दिले जाणार नाही बरं का !! उद्या सकाळी व्हाईट आर्मीच्या कोविड केअर सेंटर मधून जितक्या महिला कोरोना मुक्त होवून गेल्या आहेत त्या सर्व पुन्हा या कोविड सेंटर मध्ये परत येणार आहेत.त्या कशासाठी माहिती आहे का ? अहो व्हाईट आर्मीच्या वतीने या नवजात कन्येच्या नामकरण समारंभाचे आयोजन करण्यात आलंय आणि अशोक रोकडे आजोबा आणि या कन्येचे सगळे व्हाईट आर्मीचे जवान मामा आणि नर्सिंगस्टाफ मधील आत्या सुद्धा या नामकरण समारंभात सहभागी होणार आहेत.मग तुम्ही सुद्धा येणार ना ?
Leave a Reply