आयपीजीए नॉलेज सीरीजतर्फे खरीप पिकांची सद्यस्थिती या विषयावर वेबिनार

 

मुंबई : भारतातील डाळींचे व्यवहार व उद्योग क्षेत्रातील प्रमुख संस्था भारतीय डाळी व तृणधान्य संघटनेने (आयपीजीए) खरीप पिकांची सद्यस्थिती या विषयावर वेबिनारचे आयोजन केले आहे. ‘द आयपीजीए नॉलेज सीरिज’ या मालिकेअंतर्गत आयोजित हा वेबिनार शुक्रवारी १८ सप्टेंबर २०२० ला सायंकाळी ५ वाजता होणार आहे. आयपीजीए नॉलेज सीरिजअंतर्गत विविध विषयांवरील वेबिनार आयोजित करण्यात आले आहेत, ज्यामध्ये सरकारी, बाजारपेठेतील आणि उद्योगातील मान्यवर तज्ज्ञांनी भारतातील डाळींचा व्यवसाय या क्षेत्राची देशातील व आंतरराष्ट्रीय परिस्थिती याबाबत आपली मते मांडली आहेत.
खरीप पिकांची सद्यस्थिती या वेबिनारमध्ये सहभागी होणाऱ्या मान्यवर वक्त्यांमध्ये केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे कृषी आयुक्त डॉ. एस. के. मल्होत्रा, स्कायमेट वेदर सर्व्हिसेसचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग, जीजीएन रिसर्चचे व्यवस्थापकीय भागीदार निरव देसाई, चेन्नईच्या फोर-पी इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. कृष्णमूर्ती, अग्रोप्युअर कॅपिटल फूड्सचे (जीपीए कॅपिटल फूड्स) संचालक अनिश गोयल, कलंत्री फुड प्रॉडक्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कलंत्री यांचा समावेश आहे. या वेबिनारचे सूत्रसंचालन कमॉडिटीतील तज्ज्ञ आणि टीव्ही निवेदिका, सीएनबीसी टीव्ही१८ च्या कमॉडिटिज व करन्सीज विषयाच्या संपादक मनीषा गुप्ता करणार आहेत.
आयपीजीएचे अध्यक्ष जितू बेहडा म्हणाले, ‘’सध्या वर्षातला तो काळ आहे जेव्हा भारतात आणि परदेशांतही सगळ्यांचे लक्ष खरीप हंगामाकडे आणि किती पिक येणार याकडे लागलेले असते. अशावेळी विविध विषयांतील तज्ज्ञांना एकत्र आणून यावर्षीच्या खरीप हंगामातून काय अपेक्षा आहेत याबद्दल एक दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.’’
खरीप वेबिनारबद्दल आयपीजीएचे उपाध्यक्ष बिमल कोठारी म्हणाले, ‘’अति किंवा कमी पावसाची सर्वत्र असलेली शक्यता या घडीला तज्ज्ञांना अपेक्षित असलेल्या प्रत्यक्ष खरीप उत्पादनाच्या अंदाजाला आव्हान देऊ शकते. यात कोविड-१९ महामारीला गृहित धरलेली नाही. पेरणी, अपेक्षित उत्पन्न, मागणी व पुरवठा, किंमती त्याचबरोबर पावसाचे प्रमाण, या वर्षाअखेरीपर्यंतचे हवामान, डाळी काढणीला येईपर्यंत त्यावर होणारा हवामानाचा परिणाम, विशेषत: वर्षाअखेरीला निघणाऱ्या तुरीच्या डाळीबाबतचा अंदाज, डाळी साठवणूक, उडीद, मूग, तुर डाळीच्या उत्पादनावर होणारा कोविड महामारीचा परिणाम या महत्त्वाच्या विषयांवर या वेबिनारमध्ये चर्चा केली जाणार आहे.’’
सध्याच्या कोविड-१९ महामारीच्या काळात मिलिंग क्षेत्रासमोर असलेली आव्हाने आणि मिलिंग मार्जिन वाढवण्यासाठी मिलर्सनी आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी योजलेले उपाय याबाबतही तज्ज्ञ चर्चा करणार आहेत.भारतातील डाळी आणि धान्य व्यापार व तत्संबंधी उद्योगांची मध्यवर्ती संस्था असलेल्या इंडियान पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनचे (आयपीजीए) ४०० हून अधिक थेट व अप्रत्यक्ष सभासद आहेत, ज्यांत व्यक्ती, कॉर्पोरेट्स तसेच स्थानिक डाळ व्यापारी आणि प्रोसेसर्सच्या संघटनांचा समावेश आहे. या सदस्यांच्या माध्यमातून ही संघटना डाळींचे उत्पादन, प्रक्रिया, धान्यसाठवणूक आणि आयात उद्योग अशा संपूर्ण मूल्यसाखळीचा भाग असलेल्या १०,००० लाभार्थींशी जोडली गेली आहे. भारतीय डाळी आणि धान्य उद्योग व व्यापार जागतिक स्तरावरील स्पर्धेत टिकून राहण्यास सक्षम बनावा, व हे ध्येय साध्य करताना भारताच्या अन्न व पोषण सुरक्षेलाही बळ मिळावे हे आयपीजीएचे लक्ष्य आहे. आयपीजीए स्थानिक कृषी-व्यापार क्षेत्रामध्ये नेतृत्वाची भूमिका साकारण्याची व भारतीय बाजारपेठेत सहभागी घटकांमध्ये तसेच भारत व त्यांच्या परदेशातील सहका-यांमध्ये सुदृढ नातेसंबंधांची जोपासना करण्यासाठी जागतिक स्तरावर अधिक सक्रिय भूमिका निभावण्याची जबाबदारी आयपीजीएने आपल्या शिरावर घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!