
कोल्हापूर: कोरोना विषाणूच्या प्रादृर्भावामुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. सध्या सर्वसामान्य नागरीकांच्या समोर व्यवसाय, नोकरी, उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. लोक आपल्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रत्यन करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व घटनांमध्ये लोकांना मानसिक, आध्यात्मिक स्थैर्य मिळण्यासाठी आवश्यक असणारी मंदिरे देखील अनेक महिन्यांपासून बंद आहेत. लोकांच्या राहणीमानामध्ये बदल घडले असून देखील लोकांची देवावर असणारी श्रद्धा कमी झालेली दिसत नाही. सध्या लोकांना फक्त मानसिक समाधानाची, श्रद्धेची आवश्यकता असून त्यांची श्रद्धास्थान असलेली मंदिरे सुरु करून देवांचे दर्शन घडण्याची आस लागली आहे. याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक २९ ऑगस्ट २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मंदिरे सुरु करा यासाठी “घंटानाद” आंदोलन देखील करणात आले होते. सर्व सुरु होत असताना मंदिरे अद्याप बंद का ? त्यामुळे मंदिरे त्वरित सुरु करावीत अशा मागणीचे निवेदन आज भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्यावतीने जिल्हाधिकारीसो यांना ईमेल द्वारे देण्यात आले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असून जनजीवन सुरळीत होत चालले आहे. अनलॉक ५ सुरु झाल्याने देशांतर्गत प्रवास सुरु होऊन अनेक व्यापार, उद्योग हळूहळू सुरु होऊन सर्वसामान्य माणसाची बिघडलेली आर्थिक स्थिती सुरळीत होताना दिसत आहे. आगामी काळात नवरात्रोत्सव, दिवाळी अशा मोठ्या सणांची सुरवात होत आहे. अनलॉक ५ सुरु झाल्याने हॉटेल, मॉल, बार अशी वर्दळ होणारी ठिकाणे देखील सुरु झाली आहेत. परंतु लोकांची, भाविकांची श्रद्धास्थान असणारी मंदिरे मात्र अद्याप सुरु झालेली नाहीत. यामुळे भाविकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. इतर राज्यातील मंदिरे मात्र सुरु झाली आहेत. हॉटेल, मॉल, बार अशा ठिकाणी तोंडाचे मास्क काढले जाणार आहेत पण मंदिरामध्ये मास्क काढण्याची आवश्यकता नाही. असे असताना देखील मंदिरे अद्यप सुरु करू का नाहीत असा प्रश्न भाविकांच्या मनात येत आहे.
Leave a Reply