
कोल्हापूर : शेतकरी विरोधी कायद्याना विरोध करण्यासाठी गुरुवारी १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यात सहा ठिकाणी भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभेचे आयोजन केले आहे. या रॅली मध्ये सहभागी शेतकऱ्यांशी कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ह्या ऑनलाईन संवाद साधणार आहेत.यातील एक सभा कोल्हापूरात जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये सायंकाळी ४ वाजता मर्यादित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत होत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम मार्गदर्शन करणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी त्यांच्या गावातून ऑनलाईन पद्धतीने यामध्ये सहभागी होणार आहेत,अशी माहिती कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली लोकशाही, संविधान व संसदेचे नियम पायदळी तुडवून केंद्रातील भाजप सरकारने तीन शेतकरी विरोधी काळे कायदे आणले आहेत. या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस पक्ष देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे.
केंद्रातील भाजप सरकार सातत्याने उद्योगपतींच्या हिताचे आणि शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आता कृषी आणि कामगार कायदे आणून मोदी सरकार शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे. या काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी, कामगार उद्धवस्त होणार असून त्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे. या विरोधात काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने देशव्यापी लढाई सुरु केली आहे.
२८सप्टेंबररोजी- #SpeakUpForFarmers ही ऑनलाईन मोहीम राबविण्यात आली होती. २८ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांना निवेदन देऊन हे कायदे रद्द करण्याची मागणी केली होती. तर २ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी धरणे आंदोलन व मोर्चे काढण्यात आले होते. या आंदोलनाचा पुढचा टप्प्यात गुरुवारी १५ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता शेतकरी बचाओ रॅली व्हर्चुअल सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी बचाव रॅलीचा कार्यक्रम राज्यातील सहा ठिकाणांहून एकाच वेळी होणार आहे. हे सर्व कार्यक्रम एकमेकाशी इंटर कनेक्ट असून सहा वेगवेगळ्या ठिकाणांहून काँग्रेस नेते राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.कोल्हापूरातील या सभेला आ.पी एन पाटील आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, आ. राजू बाबा आवळे, काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच कोल्हापूर जिल्हयातील विधानसभा मतदारसंघ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिके सह विविध गावा गावातील शेतकरी या व्हर्चअल सभे मध्ये सहभागी होणार आहेत .
Leave a Reply