
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हत्तीचा उपद्रवासंदर्भात तातडीची व कायमस्वरुपी उपाययोजना करावी म्हणून खासदार संजय मंडलिक यांनी वनमंत्री नामदार संजय राठोड यांचेकडे आजरोजी मुंबई येथे समक्ष भेट घेवून मागणी केली असून यावेळी त्यांचेसोबत आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील यांचेसह वनखात्याचे मुख्य सचिव दिपक म्हैसकर, मुख्य वन अधिकारी आपटे उपस्थित होते. जिल्ह्यातील वन क्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांचा अधिवास हा मानव वसाहतीकडे वाढत आहे. जंगली हत्तींचाउपद्रव मोठ्या प्रमाणावर होत असून जीवीत व पिक हानी यामुळे वनक्षेत्रा लगतच्या गावातील ग्रामस्थांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सध्याही दोन हत्ती चंदगड, आजरा वनक्षेत्रपरीसरात वावरत आहेत. त्यामुळे या जंगली हत्तींसाठी तत्काळ निर्णय घेवून प्रतिबंधात्मक योजना करावी अशी आग्रही मागणी खासदार संजय मंडलिक यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यात नागरी वसाहतीमध्ये हत्ती फिरत असलेकारणाने या तालुक्यातील हत्ती कर्नाटक पॅटर्न वापरून परत पाठवणे व कर्नाटकातून चंदगड मध्ये येणाऱ्या हत्तींचा वायर फ्लेमिंग उभे करून प्रतिबंध करणे, प्रधान मुख्य वनसंरक्षक कर्नाटक व महाराष्ट्र यांचे समन्वयाने कर्नाटकातील पाळीव हत्ती आणून आजऱ्यातील हत्तीला कर्नाटकात पाठवणे, कर्नाटकातून येणाऱ्या हत्ती व टस्करांचा प्रतिबंध करणेसाठी खिंडीतील मार्ग वाघोत्रे – गुडवळे चंदगड येथे वायर फ्लेमिंग करणे, तामिळनाडू राज्याने हत्तींच्यासंदर्भात राबवलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करुन अशाच पध्दतीच्या योजना कोल्हापूर जिल्ह्यात राबवाव्यात, वन्य प्राण्यांमुळे शेतीमालाचे होणारे नुकसान बाजारभावाप्रमाणे मिळावा आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले. यावेळी या शिष्टमंडळात ॲड सुरेश कुराडे, जेष्ठ पत्रकार अतुल जोशी, चेंबर ऑफ कॅामर्सचे संचालक विज्ञान मुंडे हे उपस्थित होते.
Leave a Reply