१५ नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरु होतोय नवा कार्यक्रम ‘कॉमेडी बिमेडी’

 

रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी आणि खमंग फराळ हा बेत दरवर्षी दिवाळीत ठरलेला असतो. आनंदाची बरसात करणाऱ्या या सणाची आपण वर्षभर वाट पहात असतो. यंदा प्रेक्षकांची दिवाळी आणखी खास करण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी घेऊन येतय नवा कार्यक्रम ‘कॉमेडी बिमेडी’. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात निखळ हास्याचे क्षण कुठेतरी हरवत चालले आहेत. कॉमेडी बिमेडी कार्यक्रमाद्वारे हेच हरवलेले मजेशीर क्षण पुन्हा वेचण्याचा प्रयत्न असेल. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच १५ नोव्हेंबरपासून ‘कॉमेडी बिमेडी’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या अनोख्या कार्यक्रमाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘सध्याच्या कठीण काळात मनमुराद हसणं थोडं राहून गेलं. कॉमेडी बिमेडी कार्यक्रमातून तासभर धमाल, मस्ती आणि रिफ्रेश होऊ अशी निखळ कॉमेडी घेऊन येतोय तुमच्या घरी. सशक्त लिखाण, अभिनय आणि तोडीस तोड जोड्या फक्त तुमच्यासाठी.’या अनोख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाक्षेत्रात नावाजलेले १६ विनोदवीर आपल्या अफलातून स्टाईलने प्रेक्षकांना हास्याचा मनमुराद आनंद देतील. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणत्याही स्वरुपाची स्पर्धा नसेल त्यामुळे शोमध्ये परीक्षण नाही आणि परीक्षण नसल्यामुळे इथे परीक्षकही नाहीत. विनोदवीरांच्या जोड्या धमाल विनोदी स्कीटचं सादरीकरण करतील. त्यामुळे १ तास प्रेक्षकांचं फक्त आणि फक्त मनोरंजन होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सूत्रसंचालकही नसेल. त्यामुळे विनोदवीरच थेट प्रेक्षकांशी संवाद साधतील.आशिष पवार, दिगंबर नाईक, अतुल तोडणकर, मंगेश देसाई, किशोरी अंबिये, आरती सोळंकी, संतोष पवार, कमलाकर सातपुते, अंशुमन विचारे, परी तेलंग, प्राजक्ता हनमघर, शेखर फडके, बालाजी सुळ, देवयानी मोरे, शर्वरी लहादे आणि पूर्णिमा अहिरे ही कलाकार मंडळी आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतील. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागासाठी निर्मिती सावंत, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, सुप्रिया पाठारे, विकास समुद्रे, विजय पटवर्धन, अतुल आणि सोनिया परचुरे हे खास गेस्ट असणार आहेत. तर पहिल्या भागाचं सूत्रसंचालन करणार आहेत मकरंद अनासपुरे आणि कविता लाड-मेढेकर.‘कॉमेडी बिमेडी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने यंदाच्या दिवाळीत हास्याचे फटाके फुटणार आहेत. तेव्हा ही अनोखी आतषबाजी अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. पाहायला विसरु नका स्टार प्रवाहचा नवा कॉमेडी शो ‘कॉमेडी बिमेडी’ १५ नोव्हेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!