
कोल्हापूर,: काँग्रेसने आज कोल्हापुरात केंद्रसरकारच निषेध करत भाव ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी मोदी सरकार वर निशाणा साधला. जोपर्यंत हा अन्यायी कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आता लढा थांबणार नाही, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटे बोलत आले असून, खोटं बोलूनच सत्ता मिळवल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे शोषण होणारे कायदे पास केले आहेत. मात्र, आता त्यांना शेतकऱ्यांच्या अक्रोशाला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या सरकारने नुकतेच 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. नागरिकांना वाटले काहीतरी मदत मिळेल, मात्र अजून 1 पैसा सुद्धा कोणाला मिळाला नाहीय. त्यामुळे त्यांनीच आता 20 लाख कोटी कुठे आहेत हे सांगावे? असे आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारला दिले.
केंद्रसरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्या विरोधात काँग्रेसने गुरुवारी कोल्हापुरातील निर्माण चौक ते ऐतिहासिक दसरा चौकपर्यंत भव्य ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी आयोजित सभेमध्ये पाटील बोलत होते. या ट्रॅक्टर रॅलीमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार आणि पदाधिकारी सुद्धा रॅलीमध्ये सहभागी झाले होते. शिवाय मोठ्या शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने आपले ट्रॅक्टर घेऊन रॅलीमध्ये उपस्थिती लावली.
केंद्र सरकारने नुकतेच २ कृषी कायदे मंजूर करून घेतले. त्याविरोधात काँग्रेसने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज काँग्रेसच्या वतीने शहरात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून अनेक शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन आजच्या ‘भव्य ट्रॅक्टर रॅली’ मध्ये सहभागी झाले होते. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्वतः ट्रॅक्टरचे स्टेअरिंग आपल्या हातात घेतले. विशेष म्हणजे रॅलीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सतेज पाटील यांनी सारथ्य केले.
कोल्हापूर चा राजा आणि प्रजा शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदा काढल्यावर रस्त्यावर उतरतात. संतापलेले शेतकरी सरळ मार्गाने आंदोलन करतात, मात्र त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो. हे अन्यायकारक आहे. या कायद्याने शेतकऱ्यांचे शोषण होत आहे ते आम्ही सहन नाही करणार त्यामुळे सोनिया गांधी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार कृषी विधेयकाविरोधात आपण लढा देत राहू. जोपर्यंत हा अन्यायी कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आता लढा थांबणार नाही, असेही त्यांनी म्हंटले. कोल्हापुरातील आंदोलनाबाबत कौतुक करताना ते म्हणाले, कोल्हापूर बाबत खूप ऐकले आहे. जेंव्हा जेंव्हा शोषण होत आले आहे, तेंव्हा कोल्हापुरातल्या जनतेने आवाज उठवला आहे. राष्ट्रासाठी इथली जनता रस्त्यावर आली आहे. कोल्हापुरात सुरू झालेली चळवळ देशभर पोहचेल आणि केंद्र सरकारला याची दखल घ्यावी लागेल, असा इशारा सुद्धा एच. के. पाटील यांनी यावेळी केंद्र सरकारला दिला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दिल्लीमध्ये बसून बादशाही निर्णय घेणं शक्य होत नाहीत. म्हणूनच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतीविषयक हक्क राज्य सरकारकडे दिला आहे. मात्र असे असताना कोणतीच चर्चा न करता तुम्ही कायदा कसे काय करता?आज पर्यंत अनेक निर्णय घाई घडबडीत घेतले. आपल्या मित्र पक्षांना सोडाच पण पक्षातील नेत्यांकडून सुद्धा काही सल्ले त्यांनी घेतले नाहीत. नरेंद्र मोदी हट्टी पणाने काम करतात, हम करे सो कायदा असेच त्यांचे काम असल्याची टीका यावेळी चव्हाण यांनी मोदींवर केली.
कामगारांचे कायदे केंद्राने संपवले.
काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, की केंद्र सरकारने कृषी कायद्यांबरोबरच कामगारांच्या हक्काच्या कायद्यांना सुद्धा हात लावून ते संपवून टाकले आहेत. कामगाराचा विचार न करता केवळ मोठ मोठ्या मालकांचा विचार करून त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सर्वांसमोर आता या सरकारचे खरे रूप समोर येत असून शेतकरी आणि कामगारवर्गच या सरकारला धडा शिकवेल असेही थोरात यांनी म्हंटले.
पदवीधर किंव्हा शिक्षक मतदारसंघातील कोणतीही एक जागा काँग्रेसला द्या निवडून आणायची जबाबदारी माझी असेल असा विश्वास यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. नुकतीच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी काँग्रेसला उमेदवारी द्या. तशा पद्धतीने जोरदार तयारी झाली असून मोठ्या प्रमाणात नोंदणी सुद्धा झाली आहे. त्यामुळे एक जागा काँग्रेसला द्या निवडून आणायची जबाबदारी आपली राहील असा विश्वास सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
Leave a Reply