
आकाश कोरगावकर यांची अभिनव संकल्पना
कोल्हापूर/ प्रतिनिधी: मुलांच्या शारीरिक व मानसिक अश्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या वयाची पहिली सोळा वर्षे अतिशय महत्त्वाची असतात. यासाठी घराबाहेर पडून एखादा खेळ खेळणे आवश्यक असते. मुले मौजमस्ती करण्यासाठी खेळतात. पण या खेळण्यामधूनच त्यांचे शिक्षण व विकास मोठ्या प्रमाणावर होत असतो. खेळण्याने त्यांचे ज्ञान, अनुभव व आत्मविश्वास वाढून कुतूहल जागृत होत राहते. नवनवीन क्षमता उत्पन्न होत असतात. पण बहुतांशी मुले घराबाहेर पडून खेळण्यापेक्षा घरातच टीव्ही बघणे, मोबाईलवर गेम खेळणे पसंत करत आहेत. बदलत्या जीवन शैलीमुळे आहारात मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे.आता तर गेल्या काही महिन्यात लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन शिक्षणामुळे सतत त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होताना ते चित्र पाहायला मिळत आहे. व्यायाम नाही, एकाच जागी बसून शारीरिक व्याधी उत्पन्न होणे यामुळे पालकही त्रस्त आहेत. यासाठी लहान मुलांच्या संपूर्ण शारीरिक विकासासाठी कोल्हापूर शहरात ताराबाई पार्क येथे,अगदी शहरातील मध्यवस्तीत सीबीएस जवळ “रगेड कब” या लहान मुलांचे फिटनेस सेंटरची उभारणी कोल्हापूरचे सुपुत्र श्री. आकाश कोरगावकर यांनी केली आहे. पंचवीस हजार स्क्वेअर फूट या भव्य अशा परिसरात हे सेंटर साकारले असून येथे मुलांसाठी अनेक फिटनेस गेम्स असणार आहेत. यामध्ये किक बॉक्सिंग, जिम्नास्टिक, योगा, ऍथलेटिक, साहसी खेळ, मोटर स्किल्स, झुम्बा,एरोबिक्स, स्वतःला कार्यक्षम बनवण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे प्रशिक्षण इथे दिले जाणार आहे, अशी माहिती श्री.आकाश कोरगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ते वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंतच्या मुलांसाठी विविध वर्गांमध्ये येथे प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या खेळांसाठी लागणारे आवश्यक साहित्य ही या सेंटरमध्ये उपलब्ध असेल. युरोपियन देशांमध्ये फक्त मुलांसाठी फिटनेस सेंटर्स आहेत. त्याच धर्तीवर कोल्हापुरातही मुलांना सर्व प्रकारच्या आधुनिक खेळाचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न या “रगेड कब” माध्यमातून करण्यात येणार आहे.येथे प्रशिक्षण देताना त्या मुलाची सहनशक्ती, क्रयशक्ती वाढवणे, गती, लवचिकता, नैसर्गिक सामर्थ्य, समतोलपणा, चपळाई,समन्वय, अचूकपणा, धाडस या सर्व गोष्टींवर त्यांच्या सुरक्षिततेसह भर देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांना कोणत्याही आव्हानांना भविष्यात सामोरे जाता येईल.तसेच ‘रगेड कब’ मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे दररोज पालकांना आपल्या पाल्याची माहिती मिळेल. या प्रशिक्षणांतर्गत “हॉलिस्टिक ट्रेनिंग प्रोग्रॅम” म्हणजे शालेय अभ्यासक्रमाप्रमाणे खेळाच्या समग्र अभ्यासक्रमाची निर्मिती तज्ञ प्रशिक्षकांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे दररोज मुलांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तसेच आठ मुलांच्या पाठीमागे एक तज्ञ प्रशिक्षक याप्रमाणे सोळा मुलांची बॅच असेल. त्यामुळे मुलांना वैयक्तिक मार्गदर्शन याचबरोबर त्यांच्या आहारावर ही विशेष लक्ष देण्यात येणार आहे.खेळ आणि व्यायाम याचबरोबर योग्य व सकस आहार घेणे आवश्यक असते. अलीकडे मुले फास्ट आणि जंक फूड खाणे पसंत करतात. पण हे शरीरास हानिकारक असल्याने आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने फिटनेस साठी आवश्यक असा मुलांना आहार दिला जाणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी सोयीनुसार बॅचेस उपलब्ध असतील.
या सेंटरच्या सल्लागार समितीमध्ये आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ऑलिम्पियन वीरधवल खाडे,जलतरणपटू ऋतुजा भाट – खाडे, अंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू संयोगिता घोरपडे,प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. शिल्पा जाधव, शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा विभाग संचालक डॉ. प्रकाश गायकवाड ,19+ आयर्न मॅन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फिटनेस सेंटरचे संस्थापक डॉ. आनंद पाटील यांचा सहभाग आहे. तज्ञ लोकांकडून दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा फायदा यामुळे मुलांना होणार आहे.
इथे दिल्या जाणाऱ्या उत्तम मार्गदर्शनामुळे त्या मुलाचे शरीर व मन निकोप राहील.त्यांचे मनोधैर्य वाढेल. त्यांच्यात खिलाडूवृत्ती येईल. त्यामुळे ते मूल आयुष्यात अपयशाने खचून जाणार नाही. भविष्यात होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये कोल्हापूरची मुले कुठेच कमी पडणार नाहीत आणि देशाची भावी पिढी निरोगी व सुदृढ बनेल असा विश्वासही यावेळी श्रीयुत आकाश कोरगावकर यांनी व्यक्त केला.
तरी आता ऍडमिशन प्रक्रियेला सुरुवात झालेली असून नोंदणीस चांगला प्रतिसाद मिळत आहे.तरी, इच्छुकांनी लवकरात लवकर सेंटरशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. आकाश कोरगावकर व त्यांच्या संपूर्ण टीमने केले.पत्रकार परिषदेला अमोल कोरगावकर, राज कोरगावकर, सुप्रिया निंबाळकर आदी उपस्थित होते.
रगेडियन विषयी…..
रगेडियनच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो खेळाडूंना प्रशिक्षण तसेच मॅरेथॉन, ट्रेल रन, एडव्हेंचर रेस, सायकल राईड अशा अनेक आंतरराष्ट्रीय पातळीच्या स्पर्धांचे आयोजन कोल्हापुरात करण्यात आले आहे. आणि क्रीडा क्षेत्रात कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर उंचावले गेले.
Leave a Reply