सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटलांची अवस्था मानसिक संतुलन ढासळलेल्या मनोरुग्नासारखी; हसन मुश्रीफ यांची टीका

 

आजरा:महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मानसिक संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करीत आहेत, अशी घणाघाती टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. त्यामुळेच श्री. पाटील डोक्यावर परिणाम झाल्यासारखं खुळ्यासारखं बडबडत आहेत, असा उपहासात्मक टोलाही त्यांनी लगावला.चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल  श्री. मुश्रीफ यांनी आजरा येथे झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रचार मेळाव्यात  खरपूस समाचार घेतला.मंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला. दहा ते बारा लोकसभेच्या व दहा ते बारा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या.देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते एकदाही पराभूत झालेले नाहीत.ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी काहीही न करता त्यांना एकदा नव्हे दोनदा केवढी मोठी संधी मिळाली होती. किती भाग्यवान आहेत ते. परंतु या सगळ्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही.यावेळी  उमेश आपटे, जयवंतराव शिंपी, वसंतराव धुरे, दिलीप लाड, मुकुंद देसाई, तानाजीराव देसाई यांची भाषणे झाली.स्वागत संभाजी तांबेकर यांनी केले. प्रास्ताविक आजरा पंचायत समितीचे माजी सभापती अल्बर्ट डिसोझा यांनी केले.मेळाव्याआधी मंत्री श्री मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवर जनता बँकेच्या सभाग्रहात चहा घेत बसले होते. त्यावेळी हातात पावती घेऊन एक शेतकरी आला आणि श्री मुश्रीफ यांना विचारले, ‘हिंदुस्तान शुगरच्या नावाखाली पैसे घेऊन गेलेले ते तुमचे उमेदवार आलेत काय? त्यावेळी श्री मुश्रीफ यांनाही क्षणभर काहीच समजेनासे झालले. विषय लक्षात येतात श्री मुश्रीफ शेतकऱ्याला म्हणाले,  आमचे उमेदवार अरुण लाड व जयंत आसगावकर आहेत. ते पैसे घेऊन गेलेले आमचे उमेदवार नव्हेत. नंतर या विषयाची ही जोरदार चर्चा सुरू झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!