
मुंबई : ‘मनोरंजन क्षेत्रात पूर्वापार होत असलेल्या अपंगांच्या जीवनाविषयीच्या चित्रणात आता बदल होत असला तरी अजूनही खूप बदल होण्याची आवश्यकता आहे, एवढेच नव्हे तर या क्षेत्राने अपंग व्यक्तींना आपल्या क्षमता जास्तीत जास्त प्रमाणात आजमावून पाहण्याची संधी द्यायला हवी!’ अशी अपेक्षा लेखिका-अनुवादिका व पत्रकार सोनाली नवांगुळ यांनी शनिवारी सायंकाळी ‘मिती क्रिएशन्स’च्यावतीने ऑनलाईन सोहळ्यात प्रदान करण्यात आलेल्या ‘गगनाला पंख नवे’ या पुरस्काराचा स्वीकार केल्यानंतर बोलताना व्यक्त केली. सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री रेणुका शहाणे सहभागी झाल्या होत्या.
‘मिती क्रिएशन्स’ या संस्थेच्या पंधराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने व ‘नवनीत फाऊंडेशन’च्या तसेच सचिन शिंदे यांच्या सहकार्याने काल 2020 सालासाठीच्या ‘गगनाला पंख नवे’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, ज्येष्ठ संपादक व पत्रकार विजय कुवळेकर, मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, श्रीरंग गोडबोले, वर्षा पवार-तावडे आदींच्या निवड समितीने उत्तरा मोने यांच्या ‘मिती क्रिएशन्स’साठी यावर्षी चार संस्था व दोन व्यक्ती यांची पुरस्कारासाठी निवड केली होती. पुरस्कारांचे चालू वर्ष हे सहावे वर्ष आहे. कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ यांना सन्मानपत्र व 15 हजार रूपयांचा धनादेश पुरस्कार म्हणून या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.प्रारंभी डॉ. स्नेहलता देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर कार्यक्रमात उत्तरा मोने, नवनीत फाऊंडेशनचे सुनिल गाला, अॅड. सौ. भारती शिंदे तसेच विजय कुवळेकर व पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी आपले विचार मांडले. नीला सत्यनारायण यांच्या स्मरणार्थ एक विशेष पुरस्कार अनिता ढोले-पाटील यांना देण्यात आला. अन्य पुरस्कार विजेत्यांची नावे अशी :- उर्वी जंगम, ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था (रोहा), आशियाना इन्स्टिट्यूट फॉर ऑटिझम (मुंबई), दृष्टी परिवार (मुंबई) व श्री भैरव सेवा समिती (भिवंडी). कार्यक्रमात विविध गीते शाल्मली सुखटणकर व श्रीरंग भावे यांनी सादर केली तर सूत्रसंचालन पूनम चांदोरकर यांचे होते.
Leave a Reply