
श्री अंबाबाई मंदिरातील दुकानदारांकडून देवस्थान समिती कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर यांचा सत्कार
कोल्हापूर : कोरोनाच्या संकट काळात गेली आठ महिने बंद श्री अंबाबाई मंदिर बंद होते. त्यामुळे श्री अंबाबाई मंदिरातील दुकानेही बंद करण्यात आली होती. गेल्या महिन्यापासून श्री अंबाबाई मंदिर दर्शनाची मर्यादित वेळ ठरवून भाविकांसाठी खुले केले. परंतु, मंदिर आवारातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. याबाबत संबधित दुकानदारांनी दुकाने उघडण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर आणि देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर यांची भेट घेवून केली होती. त्यानुसार सौ.वैशाली क्षीरसागर यांनी नववर्षाच्या प्रारंभी श्री अंबाबाई मंदिर उघडताना आतील दुकानदारांनाही दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, यासाठी देवस्थान समितीच्या बैठकीत यशस्वी पाठपुरावा केला. त्यामुळे देवस्थान समितीने नववर्षाच्या प्रारंभी दि.१ जानेवारी २०२१ पासून मंदिर आवारातील दुकाने उघडण्यास परवानगी दिली. याबाबत मंदिर आवारातील दुकानदारांच्या शिष्ठमंडळाने आज देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर यांची भेट घेवून त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. यावेळी दुकानदारांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर आणि देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर यांचे समस्त दुकानदारांच्या वतीने आभार मानत पुढील काळात असेच काही समस्या असल्यास सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी दुकानदार शिष्ठमंडळात वैभव मेवेकरी, विश्वनाथ मेवेकरी, साजन सलुजा, संतोष काटवे, युवासेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे आदी उपस्थित होते.
Leave a Reply