खिळेमुक्त झाडांच कोल्हापूर’ मोहिम राज्यभर राबविण्यात यावी: पालकमंत्री सतेज पाटील

 

कोल्हापूर/प्रतिनिधी:पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “खिळेमुक्त झाडांच कोल्हापूर” या मोहिमेला आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यामध्ये कोल्हापुरातील ५० स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या. या स्वयंसेवी संस्थांबरोबरच पाचशे हुन अधिक वृक्ष प्रेमी कोल्हापूरकरांनी वैयक्तिकपणे ठिकठिकाणी या मोहिमेमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. यावेळी शहरातील ठिकठीकाणी जावून झाडावरील खिळे, फलक, तारा, अँगल काढून झाडांना नवसंजीवनी दिली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह आ. ऋतुराज पाटील , आ. चंद्रकांत जाधव यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. ही मोहीम राज्यभर राबविण्यात यावी असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केले.
‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश देत असतानाच आहे ती झाड महत्वाचे ठरते, झाडांना देखील संवेदना असतात हे आपण विसरून अनेक ठिकणी झाडांवर खिळे, फलक, तारा, अँगल, लोखंडी ब्रॅकेट मारले जातात. यामुळे झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. ही गोष्ट लक्षात घेऊन “खिळेमुक्त झाडांचं कोल्हापूर’ मोहीम राबविण्याची संकल्पना शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या समोर मांडली आणि त्याला उस्त्फुर्त प्रतिसाद मिळाला.
मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले की, कायद्यानुसार झाडांना इजा पोहचविणे, त्याच्यावर खिळे मारणे अशा प्रकारचे कृत्य गुन्हा ठरत असल्याने, यापुढे झाडावर खिळे मारणे अथवा बोर्ड लावणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या संदर्भातील सूचना कोल्हापूर महानगरपालिकेला दिले आहेत.
पर्यावरणाची होत असलेली हानी आणि येणाऱ्या काळात वृक्ष संपदेची गरज लक्षात घेता, केवळ कोल्हापुरपूर्ती ही मोहीम मर्यादित न राहता राज्यभर अशा प्रकारची मोहीम लोकांनी हाती घेण्याचे आवाहनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केले.मोहिमेत सहभागी झालेल्या स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांनी कटवानी, पक्कड, शिडी यांच्या साहाय्याने झाडांवरील खिळे काढले. अनेक ठिकाणी एका झाडावर तीस ते चाळीस खिळे असल्याचे आढळले. काही झाडावर असलेले लोखंडी ब्रॅकेट, साखळ्या काढण्यासाठी गॅस कटरचा सुद्धा वापर करण्यात आला. बरीच वर्षे झाडांमध्ये रुतून बसलेले खिळे तसेच करकचून बांधण्यात आलेल्या तारा काढल्यामुळे या झाडांनी मोकळा श्वास घेतला.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी सुरु केलेला हा उपक्रम आम्ही सातत्याने पूढे सुरूच ठेऊ असा निर्धार सहभागी स्वयंसेवी संस्थांनी केला. एकच नारा एकच सुर खिळे मुक्त कोल्हापूर अशा घोषणा देत, यावेळी जन जागृती देखील करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ करवीर, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, शहर युवक काँग्रेस
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, निसर्ग मित्र, मैत्रेय प्रतिष्ठान, व्हाईट आर्मी
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रम, वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन, रोटरी क्लब ऑफ शिरोली एम.आय.डी., रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईझ, डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इजि. एन.एस.एस विभाग, एनएसयूआय, कोल्हापूर, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ गार्गिज, सुमन साळवी व बाल विकास संस्था, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फौडेशन, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, कोल्हापूर ट्रॅव्हल एजंटस् असो., जिल्हा युवक काँग्रेस, कोल्हापूर, रोटरी क्लब ऑफ हॉरीझोन, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी, कोल्हापूर, राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ, जायंन्ट्स ग्रुप मैत्री फौंडेशन, कोल्हापूर आर्ट फौंडेशन, विज्ञान प्रबोधिनी, डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज एन.एस.एस विभाग, रोट्रॅक्ट क्लब, क्षेत्रीय फाउंडेशन यांच्या सह पन्नासहुन अधिक स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!