अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ; भाजपा आ.सुनील कांबळे

 

कोल्हापूर: अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण शिष्यवृत्तीच्या निधीमध्ये 59 हजार कोटी रू. अशी भरीव वाढ केल्यामुळे आता या विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग खऱ्या अर्थाने सुकर झाला आहे. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सामाजिक कल्याण मंत्री मंत्री थावरचंद गेहलोत अभिनंदन करतो असे प्रतिपादन भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेवेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, अनुजा मोर्चा संयोजक अमर साठे उपस्थित होते. आमदार सुनील कांबळे म्हणाले की, आत्तापर्यत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या ‘पीएमएस-एससी’ या योजने अंतर्गत उच्च शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती ही पुरेशी नव्हती तसेच या शिष्यवृत्तीच्या वितरणातही भ्रष्टाचाराच्या तक्रारी होत्या. केंद्रीय मंत्रिमंडळाने अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती निधीमध्ये गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत सर्वोच्च वाढ केली आहे. शिष्यवृत्तीचे वाटप पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता, आधार ओळखपत्र, जातीचे प्रमाणपत्र व बँकेचे तपशील पडताळून ऑनलाईन (डीबीटी) पद्धतीने निधीचे वितरण करण्यात येणार आहे. 2017 ते 2020 या कालावधीत अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती करीता दरवर्षी 1100 कोटी रूपये निधी दिला जात होता. आता आगामी पाच वर्षात दरवर्षी हा निधी 6 हजार कोटी रू. करण्यात आला आहे. या निधीतील केंद्र सरकारचा वाटा 60 टक्के असून राज्य सरकारांना 40 टक्के खर्च करावा लागणार आहे.
‘पीएमएस-एससी’ या योजनेच्या निधीत यापूर्वीच अशी वाढ करणे अपेक्षीत होते. मात्र, यापूर्वीच्या काँग्रेस प्रणित युपीए सरकारने केवळ राजकारणासाठीच आंबेडकर, फुले-छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा वापर केला. अनुसूचित जाती वर्गातील लोकांच्या खऱ्या अडचणी समजून घेऊन ते सोडवण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले नाहीत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या निधीत वाढ करून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मार्ग खुला केला आहे. दहावीनंतर पैशाअभावी ज्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुनील कांबळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!