
कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापूर हे नेहमी आगळं वेगळं काही तरी करण्यासाठी जगात भारी म्हणून ओळखले जाते. याची प्रचिती पुन्हा आली आहे. कोल्हापूरचे रजत ओसवाल यांनी चक्क ऑटो रिक्षातून संपूर्ण उत्तर भारताची सफर यशस्वीपणे पूर्ण केली आहे. रिक्षा स्वतः चालवत रजत ओसवाल यांनी तब्बल ५६४० किलोमीटरचा कोल्हापूर- ऋषिकेश- मनाली ते पुन्हा कोल्हापूर अश्या प्रवासाची साहसी मोहीम पार पाडली. उत्तर भारत हा हिमालयाच्या पर्वतरांगा यांनी नटलेला आहे. आज पर्यंत सायकल, बुलेट अशा अनेक माध्यमातून अनेकांनी साहसी प्रवास केलेला आहे. पण ऑटोरिक्षातून हा साहसी प्रवास करणे ही बहुधा पहिलीच घटना आहे. या धाडसी मोहिमेस २० डिसेंबर २०२० रोजी शुभारंभ झाला होता. २७ दिवसात ही मोहीम पूर्ण करण्यात आली.
तसेच या प्रवासादरम्यान ‘स्तनाचा कर्करोग’ आणि पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी ‘एक झाड लावा एक झाड वाचवा’ या दोन समस्यांबद्दल जनजागृती करण्यात आली. या मोहिमेदरम्यान प्रत्येक राज्यातील पोलिसांचे खूप मोठे सहकार्य लाभले. तसेच हिमालयाच्या रांगांमधून रिक्षाने प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण आई अंबाबाईच्या आशीर्वादाने या सर्व अडचणींवर मात करण्यात यशस्वी ठरलो. त्याचप्रमाणे वाटेत ट्रक चालकांचे ही खुप चांगली मदत झाली. कोल्हापूर मधून रिक्षाने ती ही स्वतः चालवत असल्याने लोकांना याचे कौतुक वाटत होते.अशी प्रतिक्रिया रजत ओसवाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
रिक्षा हे सर्वसामान्य लोकांचे दळणवळणाचे साधन आहे. अशाप्रकारे लक्ष वेधून घेणारी रिक्षा लोकांना आकर्षित करत होती.कधी किमान ५ तर कधी किमान १० तपमान तसेच प्रचंड थंडी आणि बर्फवृष्टी यांना सामोरे जात रजत ओसवाल यांनी ही मोहीम पूर्ण केली. या धाडसी व यशस्वी मोहीम पूर्ण केल्याबद्दल आज कसबा बावडा येथील न्यु पॅलेस येथे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी रजत ओसवाल यांचे स्वागत व अभिनंदन केले. या यशस्वी मोहीमेबद्दल समाजातील अनेक स्तरांतून रजत ओसवाल यांचे कौतुक होत आहे. यावेळी जयेश ओसवाल उपस्थित होते.
Leave a Reply