कागलमध्ये बांधकाम कामगारांचा विराट मेळावा संपन्न

 

कागल :केंद्रातील भाजप सरकारने कामगारांना उद्ध्वस्त करुन अक्षरश: देशोधडीला लावले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता कामगारांच्या लढाईसाठी कंबर कसुया, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. केंद्रातील भाजप सरकार आणि भाजप राजवट असलेल्या राज्य सरकारांनी कामगारांची परवड केली, असेही ते म्हणाले.कागलमध्ये आयोजित बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कोल्हापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय व लाल बावटा बांधकाम कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी सिटू संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे होते.मंत्री मुश्रीफ म्हणाले, केंद्र सरकारने कामगारांच्या सुरक्षिततेचे ४४ कायदे रद्द करून चार संहीता आणल्या आहेत. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षित भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात बांधकाम कामगार कायदा १९९६ साली मंजूर होता. परंतु; आपल्या कामगार मंत्रिपदाच्या काळात या असंघटित बांधकाम कामगारांसाठी इमारत बांधकाम कामगार मंडळ स्थापन केले. आयुष्यभर गरीब माणूस डोळ्यासमोर ठेवूनच समाजकारण केले, असे सांगतानाच मंत्री मुश्रीफ म्हणाले, इमारत बांधकाम कामगार मंडळाच्या माध्यमातून गवंड्यासह, पाया खुदाई मजूर, दगडफोड्या, प्लंबर आदी कामगाराचे कोट कल्याण केले.सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व कामगारांचे ऋणानुबंध घट्ट आहेत. हे नातं यापुढेही असेच टिकवूया. मंत्री श्री मुश्रीफ यांच्याकडे कामगार खाते नसले तरी कामगारांचे प्रश्‍न शासन दरबारी तळमळीने मांडतील व सोडवतील अशी अपेक्षाही श्री. कांबळे यांनी व्यक्त केली.सीटू संघटनेचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शिवाजी मगदूम म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे राज्यकर्ते निर्ढावलेले आहेत. भाजप सरकारच्या काळात २० ते २१ मोर्चे काढूनही एकही मागणी त्यांनी मान्य केली नाही. महाविकास आघाडी सरकारने देशाचे नेते शरद पवार यांच्या सूचनेनुसार कोरोना काळातही कामगारांना आर्थिक मदत केली, असेही श्री मगदूम म्हणाले.आजरा तालुकाध्यक्ष प्रकाश कुंभार म्हणाले, महाराष्ट्रातील गेल्या वेळच्या भाजप सरकारने संघर्ष करुनही कामगारांना फरफटतच नेले. त्यामुळेच महाराष्ट्र भाजपमुक्त होऊन त्यांचे सरकार गेले.कामगार आयुक्त संदेश अहिरे यांनी कामगारांविषयीच्या विविध योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. स्वागत मोहन गिरी यांनी केले. सूत्रसंचालन रामचंद्र सुतार यांनी केले. आभार विक्रम खतकर यांनी मानले.

पेन्शन व मेडिक्लेम साठी प्रयत्नशील…….
मंत्री मुश्रीफ म्हणाले नोंदीत इमारत बांधकाम कामगार साठ वर्षाचा झाल्यानंतर तो शारीरिकदृष्ट्या थकलेला असतो. बांधकामाशी संबंधित कोणतीच कामे तो करु शकणार नाही. त्यासाठी त्याच्या वृद्धापकाळात हातभार म्हणून त्याला वयाच्या साठ वर्षानंतर सेवानिवृत्ती पेन्शन मिळवून देण्यासाठीही प्रयत्नशील राहू. कामगारांच्या बंद पडलेल्या मेडिक्लेम योजना सुरू करण्यासाठीही प्रयत्नशील राहू, असेही श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

निम्मं दुखणं बरं झालय……
कॉम्रेड शिवाजी मगदूम म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सरकारच्या राजवटीत मंत्री मुश्रीफ हे कामगार मंत्री असताना कामगारांना मेडिक्लेम योजना सुरू होती. ती भाजप सरकारने बंद करून टाकली. साहेब, हे आमचं लय दिवसाचं दुखणं आहे. दरम्यान; महाराष्ट्र भाजपमुक्त झाल्यामुळे आमचं निम्मं दुखणं बरं झालंय. आता निम्म तुम्ही बरं करा, असेही श्री मगदूम म्हणाले.यावेळी सरकारी कामगार अधिकारी यशवंत हुंबे, राहुल तोडकर, इंद्रजीत पाटील, राधानगरी तालुका अध्यक्ष कॉम्रेड संदीप सुतार, भुदरगड तालुका अध्यक्ष कॉम्रेड शिवाजीराव मोरे, तालुका सचिव राजाराम आरडे, दगडू कांबळे, राहूल निकम, उमेश चौगुले आदींसह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!